Followers

Monday, 18 May 2020

किल्ले महिमानगड

वैभव महाराष्ट्राचे!

शंभू महादेव डोंगररांगेच्या एका फाट्यावरील लहानश्या टेकडीवर महिमानगड वसवला आहे. या गिरिदुर्गची उंची समुद्रसपाटीपासून ९८३ मी. आहे. महिमानगडाच्या दक्षिण पायथ्याला उकिर्डे तर उत्तर पायथ्याला महिमानगडवाडी ही गावे आहेत. सातारा - पंढरपूर रस्त्यावर दहिवडीच्या जवळ उकिर्डे गावातून वळून महिमानगडवाडी गाव गाठावे. गावात पुरातन घरांचे अवशेष आजही पहायला मिळवतात. गावा मागील गडाचा कातळकडा आणी त्यावरील तटबंदी आपले लक्ष वेधून घेतेच ! गावातून मळलेल्या वाटेने गडाच्या कड्याकडे गेल्यावर कड्यात एक भुयारी टाके दिसते. पुढे पायऱ्यां चढून तटबंदीतील दोन बुरूजात असलेल्या प्रवेश द्वारात पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बुरूजांची रचना अशी केलेली आहे की, प्रवेशद्वाराजवळ येई पर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. प्रवेशद्वाराच्या चौकटीवर हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.

प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर गडाचा माथा पुर्वपश्चिम पसरलेला दिसतो. किल्यावर हनुमानाचे मंदिर आहे. त्याच्या समोरच बुरूजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मंदिरापासून पुर्वेकडे गेल्यावर घरांचे जोते आणी वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. वाड्याच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. पुढे गेल्यावर खालच्या बाजूस पाण्याचा सुंदर बांधीव तलाव आहे, तलाव बऱ्यापैकी खोल आहे. या तलावात बारामही पाणी असते. या बांधीव तलावाच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. पुढे चार पाच पाण्याची टाकी आहेत. गडाच्या ईशान्येस असलेल्या सोंडेकडे गेल्यावर बुरूज तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते. सोंडेच्या टोकाला ही एक बुरूज आहे. किल्ल्यावरून वर्धनगड, ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.

किल्ले महिमानगड, ता. माण, जि. सातारा

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment