दुर्ग म्हणजे किल्ला.
दुर्ग म्हणजे किल्ला.मानव जातीच्या इतिहासातील एक महत्वाचे अंग.
जेव्हापासून मानवाला स्वतःची आणि आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या
सुरक्षिततेची गरज भासली तेव्हा पासून दुर्ग निर्मितीला सुरुवात झाली.मग
त्यातूनच दुर्गशास्त्राचा आविष्कार झाला. भारतात जवळ जवळ आठ हजार
वर्षांपासून दुर्ग बांधणीची कला किंवा शास्त्र अस्तिवात होते, परंतु
व्यापार करायला आलेल्या इंग्रजांनी हे आपल्यापासून सोयिस्कररीत्या लपवले.
सातवाहन काळात इ. स. पूर्व २३० ते इ. स. पूर्व २१० मध्ये मोठया प्रमाणात
दुर्ग बांधणी झाली. कातळात खोदून काढलेली टाकी व कातळात खोदून काढलेले
दरवाजे व मार्ग हे सातवाहन काळातील दुर्ग बांधणीचे वैशिष्टय समजले जाते.
पुढे देवगिरीचे यादव व कोल्हापूर येथील शिलाहार राजा भोजच्या काळात दुर्ग
उभारणीचे उल्लेख मिळतात, यानंतर सतराव्या शतकात दख्खन मध्ये बरेच दुर्ग
उभारले गेले. अनेक सम्राट आणि राजांनी उभारलेल्या दुर्गांमुळे महाराष्ट्र
गिरिदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग व मिश्रदुर्ग यांनी समृद्ध बनला. छत्रपती
शिवरायांचा काळ तर दुर्गांसाठी सुवर्णकाळ ठरला.महाराजांनी किल्ल्याचे
सामर्थ्य अचूक ओळखले.
छत्रपती शिवरायांच्या आगोदर बऱ्याच
शासनकर्त्यांनी भारतात अनेक दुर्ग बांधले पण किल्ल्यांना शिवरायांच्या
काळात जेवढी प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळाली तेवढी कुठल्याच काळात मिळाली
नाही. म्हणूनच की काय महाकवी भूषणकृत खालील पंक्ती महत्वाच्या वाटतात.
" दक्खनके सब दुग्ग जिते
दुग्ग सहार विलास
शिवसेवक शिवगडपती
कियो रायगड निवास"
वरील ब्रिजभाषेतील काव्यात कवी भूषणान यांनी छत्रपती शिवरायांबद्दल खूपच वीररसपूर्ण काव्यात्मक उदगार काढलेत .ते म्हणतात,'दख्खन के म्हणजे दक्षिणेतील सर्व किल्ले शिवरायांनी जिंकलेत आणि असा हा महापराक्रमी राजा दुर्गांच्या आश्रयाने राहतो आणि आता तो त्यामुळे गडपती झालाय आणि अशा ह्या राजाचे वास्तव्य रायगडावर आहे , तर अशा ह्या दुर्ग दुर्गेश्वर रायगडास माझे अभिवादन!'
"हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत" अशा आशयाचे एक
अतिशय मार्मिक वाक्य शिवरायांच्या तोंडून आल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो.
त्यावेळचे हे उदगार किती महत्वपूर्ण होते याची प्रचिती शिवरायानंतर
पुढील 15 ते 20 वर्षात आली. सर्व दख्खन काबीज करायला आलेला औरंगजेब की
ज्याच्या एका धडकेनिशी मोठ मोठी आदिलशाही आणि कुतुबशाही एका झटक्यात पडली.
पण काही वर्षांपूर्वी उभी राहिलेलं "स्वराज्य" काही संपवू शकला नाही आणि
शेवटी ह्याच मातीत मिळाला आणि हे सर्व शक्य झाले शिवरायांनी बांधलेल्या
आणि ठेवलेल्या भक्कम दुर्गांमुळे आणि तितक्याच भक्कम माणसांमुळे.
रामचंद्रपंत कृत आज्ञापत्रात "दुर्ग हे तर साऱ्या राज्याचे सार" असाही
उल्लेख सापडतो, तसं पाहिलं तर महाराजांच्या व्यक्तिमत्वापासून किल्ले वेगळे
होऊच शकत नाही. आजही महाराष्ट्रातल्या लहानातील लहान मुलाला विचारा
.किल्ले म्हटले की शिवरायांचे असेच तो म्हणेल!
महाराज जन्मले
किल्ल्यावर, महाराज रांगले किल्ल्यावर, महाराजांनी राजकारण खेळले तेही
किल्ल्यावरून आणि शेवटी महाराज विसावले ते ही किल्ल्यावरच....म्हणूनच
महाराजांना 'छत्रपती' सोबत 'गडपती' ही देखील उपाधी दिली जाते. हिंदवी
स्वराज्यच मुळी निर्माण झाले ते गडांच्या सहाय्याने.
ऋषी शुक्राचार्यांनी शुक्रानीतीमध्ये दुर्गांचे महत्व विशद करताना म्हटले आहे की,
" एक:शतं योधति दुर्गस्थ: अस्त्रधरो यदी |
शतं दशसहस्त्राणि तस्माद दुर्ग समाश्रयेत" |
अर्थात दुर्गांच्या आश्रयाने एक सशस्त्र मनुष्य शंभर शत्रूंशी लढू शकतो
आणि शंभर वीर दहा हजार शत्रूंशी लढू शकतात .म्हणूनच राजाने दुर्गाचा आश्रय
घ्यावा.
महाराजांच्या जन्मापूर्वी हजारो वर्षे आगोदर आपणांस
दुर्गांचे महत्व माहीत होते पण त्यातील सामर्थ्य ओळखून, त्याचा उपयोग
महाराजांच्या पूर्वी कोणीही केलेला दिसत नाही.
"किल्ला" हा मुळात
अरबी शब्द. "कलआ" ह्या अरबी शब्दाचा तो अपभ्रंश आहे. त्यास फारसी मध्ये
"किल्ला" तर संस्कृत मध्ये "दुर्ग" म्हटले जाते तर मराठीत "गड", हिंदीत
"गढ "असे म्हटले जाते.पाण्यातील किल्ल्याला अरबीत "जझिरा" म्हटले जाते
"जंजिरा" हे जझिरा चे अपभ्रंश रूप.
No comments:
Post a Comment