वैभव महाराष्ट्राचे!
अजिंठा डोंगररांगेवर अजिंठा लेण्यांच्या वैभवसंपन्न परिसरात वेताळगड उर्फ वेताळवाडी हा अपारसुंदर गिरीदुर्ग वसलेला आहे. वेताळगडाच्या पायथ्याशी वेताळवाडी गाव आहे. वेताळवाडीस संभाजीनगर (औरंगाबाद) - सिल्लोड पासुन दोन मार्ग आहेत, पहिला सिल्लोड - हळदा - वेताळगड व दुसरा सिल्लोड - फर्दापुर - सोयगाव - वेताळवाडी. या दोन्ही मार्गाने गड भटकंती साठी जाता येते. हळदा घाटरस्ता गडास स्पर्श करून जात असल्याने या मार्गाने आपण वेताळगडाच्या प्रवेशव्दारा जवळ पोहोचतो. दोन भव्य बुरूजात लपवलेला दक्षिणाभिमुख दरवाजा अाजही सुरक्षित आहे. प्रवेशव्दाराचे तोंड वैशागडाकडे आहे. दरवाजाच्या कमानीवर दोन बाजूस शरभ शिल्प कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी देवड्या असून दरवाजावर जाण्यासाठी जीना आहे. दरवाजाच्या छतावर एक चौकोनी खाच असून त्यातून उतरणारा जीना एका मोठ्या खोलीत उतरतो. दरवाजावर उभे राहील्यावर आपल्याला लांबवर वैशागड दिसतो तसेच मागे वळून पाहील्यास वरच्या बाजूला बालेकिल्ल्याची मजबूत तटबंदी नजरेस पडते. दरवाजाच्या तटबंदीत जवळच दोन विशाल बुरूज अशा रितीने बांधले आहेत की तेथून दरवाजातील शत्रूवर हल्ला करता येईल. दोन्ही बुरूजास प्रत्येकी एक नक्षीदार सज्जा आहे. सज्जात उतरायला पायऱ्या आहेत. लपून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी याचा प्रभावी वापर होत असेल.
गडप्रवेश केल्यावर डावीकडे लांबवर तटबंदी पसरलेली दिसते, तर गडमाथ्यावर बालेकिल्ला! पहिले डावीकडील तटबंदी पहात टोकापर्यंत जाऊन यायचे. आता तटबंदीस उजव्या बाजूला ठेवत थोडेसे वर चढल्यावर खांब टाके दिसते. तटबंदीच्या बाजूने टेकडी कडे चढत गेल्यावर आपण पूर्व टोकाच्या बुरुजापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्यावर पूर्वेकडून प्रवेश केल्यावर बुरूजाजवळ एक छोटा घुमट पहायला मिळतो. इमारतीच्या छ्ताला एक झरोका ही आहे. मध्यभागी असलेल्या बुरूजापुढे जमिनीत बांधलेले तेल तुपाचे टाके पहायला मिळते. या टाक्याच्या जवळच धान्य कोठाराची वास्तू आहे. इमारतीच्या समोर पुढे गेल्यावर नमाजगीर (मस्जिद) आहे. तिच्या भिंतीवर निजामाचे चिन्ह आणि त्याच्या खाली क्रॉस कोरलेला आहे. या सर्व अवशेषा समोर गडावरील सुंदर तलाव आहे. प्रशस्त गोलाकार तलावाला चिरेबंदी कठडा बांधलेला आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तर टोकावर बारादरी आहे. या इमारतीस चार मोठ्या कमानी आहेत. बारादरीतून खालच्या बाजूस गडाचा मुख्य दरवाजा आणी त्याखालील वेताळवाडी गाव सुंदर दिसते. वेताळगडाच्या मुख्या दरवाजाकडे जाताना एक बुजलेले टाके दिसते. जवळच ६ फूट १० इंच लांबीची एकमेव तोफ पहायला मिळते. तसेच उजव्या बाजूच्या तटबंदीत चोर दरवाजा दिसतो. तटबंदीच्या दोन बुरूजात एका मागे एक असे दोन मुख्य दरवाजे बसवलेले आहेत. एक दरवाजा उत्तराभिमुख तर दुसरा पश्चिमाभिमुख आहे. दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी देवड्या आहेत. दरवाजाचा एक बुरूज बलाढ्य असून त्यावर दोन शरभ शिल्पांच्या मध्ये अजून एक शिल्प कोरलेले पहायला मिळते.
वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात
रूद्रेश्वर लेणी आहेत. लेण्यात शिवलिंग व नंदी यांच्या सह नरसिंह, गणेश,
भैरव आणी सप्तमातृका यांची शिल्पे पहायला मिळतात. वेताळगड आणी रूद्रेश्वर
लेणी पहायला पावसाळा हा फार उत्तम ऋतू आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment