Followers

Monday, 18 May 2020

किल्ले सोनगड

वैभव महाराष्ट्राचे!

सह्याद्री पर्वतरांगेत सर्वांत उंच शिखर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या कळसूबाई पासून पुर्व पश्चिम पसरलेल्या रांगेस कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेवर बरेच सुप्रसिद्ध गडकोट वसलेले आहेत, त्यातच रांगेच्या सर्वात पुर्वेस दोन अपरिचित गडांची जोडगोळी ही वसलेली आहे. इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही. गिर्यारोहकांकडून कायमच उपेक्षीत राहीलेले हे किल्ले म्हणजे सोनगड आणी पर्वतगड! सिन्नर तालुक्यात भोजापूर धरणाजवळ सोनेवाडी हे लहानसे गाव सिन्नर अकोले मार्गावर आहे. सोनेवाडी (भोजापुर) हे गडपायथ्याशी असून गावाच्या मागे सोनगड आणि पर्वतगड हे दोन किल्ले एका खिंडीने वेगळे झालेले दिसतात. सिन्नर - डुबेरा - ठाणगाव - सोनेवाडी या मार्गे सोनेवाडी गाठता येतो. सोनेवाडीतील पुरात वाडा अखेरचा श्वास घेत आहे, त्याला भेट देऊनच गड भटकंतीसाठी निघायचे.

किल्ले सोनगड भोजापुर गावांच्या मागे डोंगरावर उभा आहे. समुद्रसपाटीपासून ८५० मी. उंचीचा हा गिरीदुर्ग पुर्व- पश्चिम पसरलेला आहे. सोनेवाडी गावातून सोप्या वाटेने गडावर जाता येते. खिंडीतून येणारी वाट गडा खालील पठारावर येते. या पठारावर उध्वस्त घरांचे चौथरे दिसतात. एका चौथऱ्यावर एक शिवलिंग, नंदी आणी श्री गणेश दर्शन देतात. महादेवाचे दर्शन करून सरळ जाणारी वाट पकडून सोनगडाकडे निघायचे. माहीतीसाठी पठारावरून उजव्या बाजूची वाट पर्वतगडला जाते. गडावर चढताना वाटेवर टप्प्याटप्प्याने कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. गडाचा माथा सुळक्यासारखा असून चिंचोळा आहे. वाटेत एका ठिकाणी पादुका कोरलेले दोन दगड दिसतात. गडमाथा चढताना वाटेच्या उजव्या बाजूस पाणी टाके आहे, त्यात पाण्याची जागा सिताफळ आणी कॅक्टसने व्यापली आहे. अजून थोडे वर चढल्यावर उजव्या बाजूस कड्यात खालीवर अशी दोन प्रशस्त पाणी टाकी आहेत. त्यांच्या पर्यंत पोहोचणे जरा कठीण आहे. गडाच्या कातळ माथ्यास डावीकडे ठेवत वळसा मारून पलीकडे गेल्यावर एक प्रशस्त कपार गुहा दिसते. ती पाहून आल्या पावली मागे फिरायचे. कड्यात पायऱ्या कोरलेल्या असुन शेजारील कपारीत दगडाला शेंदुर फसलेला आहे. या ठिकाणी माता भवानीची मुर्ती आणी त्रिशूल लावलेला आहे. याच्यावर रचिव दगडांची तटबंदी दिसते, कोसळणारी तटबंदी सावरण्यासाठी तटबंदीच्या खाली एक भलामोठा ओंडका ठेवलेला दिसतो. येथे गडाचा मुख्य दरवाजा असून पुर्णपणे नामशेष झालेला आहे.

कातळकोरीव पायऱ्या चढून गडप्रवेश होतो. उजव्या हाताला कड्यालगत पाण्याची दोन टाकी खोदलेली दिसतात. टाकी पुर्णपणे मातीने बुजलेली असून त्यांच्यापर्यंत थोडे सांभाळूनच जावे लागते. दुसऱ्या टप्प्यावर असलेली रचिव दगडांची तटबंदी चढुन गेल्यावर गडमाथ्यावर प्रवेश होतो. प्रवेशद्वार अस्तित्वात नसले तरी त्यांचे अस्तित्व मात्र जाणवते. गडमाथा खुपच अरूंद असून सुरूवातीस पांढऱ्या रंगात रंगविलेले मंदीर दिसते. मंदिरा समोर भगवा ध्वज आहोरात्र फडकत अाहे. मंदिरा समोर पडक्या वास्तूत नगारा व एका ग्रामदेवतेची दगडी मुर्ती आहे. ग्रामदेवते समोर दोन लहान नंदी ठेवलेले आहेत. जवळच जमिनीत गोलाकार तासलेला दगड रवलेला आहे. मंदिराच्या आत अश्वारूढ खंडोबा आणी म्हाळसा देवीची मुर्ती आहे. जय मल्हार म्हणून भंडारा उधळायचा आणी मंदीराच्या मागे असलेले भलेमोठे कातळात खोदलेले पाण्याचे टाके पहायला निघायचे. टाक्यात पाणी जमा करण्यासाठी कातळात चर खोदलेले ही दिसतात. गडाच्या पश्चिम कड्यावरून जोडकिल्ला असलेल्या पर्वतगडाचे विस्तृत पठार दिसते . सोनगडाचा वापर केवळ टेहळणी करीता होत असावा. गडावरून भोजापुर धरण तसेच दुरवर आड औंढा हे गड तसेच कळसूबाई शिखर दिसते.
किल्ले सोनगड, ता. सिन्नर, जि. नाशिक

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment