वैभव महाराष्ट्राचे!
अजिंठा सातमाळ डोंगर रांगेतील एक बलाढ्य गिरीदुर्ग किल्ले अहिवंत. समुद्र सपाटी पासून १२२३ मीटर असणाऱ्या अहिवंत किल्लास जाण्यासाठी नाशिकमार्गे वणी गाठावे. नांदुरी रस्त्याचा घाट चढून गेल्यावर लगेच डावीकडे दरेगावला रोड आहे. दरेगावात मुक्कामा साठी हनुमानाचे प्रशस्त मंदिर आहे. गावाच्या बाहेरून एक ठळक वाट डावीकडे असणाऱ्या डोंगरसोंडे पर्यंत जाते. येथुन वर चढुन गेल्यानंतर आपण एका खिंडीत पोहोचतो. वाट थोडी जंगलात शिरून थेट गडाच्या व त्याला चिटकून असणाऱ्या बुध्या डोंगराच्या खिंडीत जाते. खिंडीपासून एक वाट गडावर जाते व दुसरी बुध्याच्या माथ्यावर जाते. अहिवंत गडावर तीन वाटा येतात, एक वरील, दुसरी किल्ले अचला कडून बिलवाडी मार्गे गडाच्या मुख्य प्रवेश द्वारातून येते. तर तीसरी वाट अहिवंत वाडीतून डोंगर धारेवरून पहिल्या वाटेत लागलेल्या खिंडीत येते.
गडाचा माथा अतिशय विस्तृत असून संपूर्ण माथा फिरण्यास संपुर्ण दिवस भटकावे लागते. किल्ल्याच्या सोंडा पुर्व, पश्चिम, वायव्य आणि ईशान्येकडे लांबलचक पसरलेल्या आहेत. गड चढाई करण्याआधी पहिला उपदुर्ग बुध्या पहायचा, हा अहिवंत गडाचा जोडदुर्ग आहे. खिंडीतून गडावर जाण्यास वाटेत कातळकोरीव पायऱ्या आहेत. पडक्या दरवाजातून गड प्रवेश होतो. येथून बुध्या अप्रतिम दिसतो. गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालत गेल्यावर वाटेत पडका वाडा, घरांची खुपसारी जोती लागतात. पुढे एक मोठा तलाव आहे. त्याला लागुनच पडके मंदिर व देवतांच्या मोठ्या मुर्ती आहेत. हनुमंत, सप्तशृंगी माता, शंभुमहादेवची पिंडी व नंदी आहेत. पुढे माथ्यावर चढताना घरांची जोती लागतात, माथ्यवर सुध्दा खुपसारी घरांची जोती, राजवाड्याचे भग्नावशेष व शौच्चकुप आहे. यावरून हा किल्ला मोठे लष्करीय ठाणे असावे असे वाटते.
दक्षिण बाजुला असणाऱ्या कड्याला गुहा आहे, पण ती चटकन सापडत नाही. या
गुहेपासून १० मिनिटाच्या अंतरावर पिण्याच्या पाण्याचे एक टाके आहे. टाके
शंकराच्या पिंडी सारखे बांधलेले आहे. जवळच खंडेरायाची म्हाळसादेवी सोबत
अश्वारूढ मुर्ती आहे. सर्वोच्च माथ्याला उजवीकडे ठेउन वळसा मारल्यावर एक
प्रशस्त बांधीव तलाव लागतो. येथून अजिंठा सातमाळ रांगेतील किल्ले दिसतात.
किल्ल्याच्या ईशान्य बाजुच्या वाटेने किल्ल्यावर येताना गुहा कोरलेल्या
आढळतात. तुटलेल्या पायऱ्या व बुरूज तटबंदी लागते. सोंडेवर चार टाकी आहेत,
तसेच शेवटी बुरूज आहे. गडाकडे येताना कातळकोरीव पायऱ्यांची वाट पडक्या
दरवाजातून गडावर येते, हाच गडाचा राजमार्ग! पुढे कड्याला लागून घरांची
भरपूर जोती आहेत. येथून पुर्वेस सप्तशृंगी, मार्कंड्या, जवळ्या - रवळ्या,
धोडप हे किल्ले दिसतात. पश्चिमेस अचला दिसतो. तर ईशान्येस मोहनदरी दिसतो.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment