वैभव महाराष्ट्राचे!
माणगंगा नदीचा उगम कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. सीतामाई डोंगररांगेच्या डाव्या कुशीवर किल्ले वारूगड बांधलेला आहे. समुद्रसपाटीपासून ९१९ मी. उंचीचा हा गिरीदुर्ग भटकंती साठी फलटण दहिवडी मार्गावरील मोगराळे गावातून तोंडले - वारूगड असा गाडीमार्ग आहे. शंभू महादेव डोंगर रांगेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले संतोषगड सोबत किल्ले वारूगड ही बांधून घेतला.
वारूगडाची माची प्रशस्त आसून घेरा ही मोठा आहे. तटबंदी तोडून गेलेल्या रोडने माचीवरील घोडेवाडीत प्रवेश होतो. घोडेवाडी माचीवर असली तरी ती तटबंदीच्या बाहेर वसलेली आहे. माचीवर घरांचे, वाड्यांचे अनेक अवशेष पहायला मिळतात. दोन तीन पाण्याची टाकी तसेच दोन मोठी तळी सुद्धा आहेत. मचीवर भैरवनाथाचे जीर्णोद्धारीत सुंदर आणी प्रशस्त मंदिर आहे. मंदिरासमोर शिवलिंग आणी नंदी महाराज आहेत. देवदर्शन आटपून कड्यावर असलेल्या तटबंदीवर चढून फेरी मारायची. बुरूज आणि तटबंदी आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. पूर्वी या तटबंदीत ५ दरवाजे होते. मात्र सद्य स्थितिला दोनच दरवाजे शिल्लक आहे. गिरवी कडून जाधववाडी मार्गे माचीत प्रवेश करणारी वाट फलटण दरवाजातून गडावर येते. हा दरवाजा ही चांगल्या अवस्थेत असून अप्रतिम बांधलेला आहे. माचीवरून बालेकिल्ल्याची टेकडी आणी तटबंदी फार सुंदर दिसते.
भैरवनाथ मंदिरापासून बालेकिल्ल्यास डावीकडे ठेवत वळसा
मारला की बरोबर मंदिराच्या विरुद्ध बाजूस बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.
बालेकिल्ल्यास दोन टप्प्यात बुरूज तटबंदी बांधलेली आहे. तुटलेल्या
पायऱ्यांनी दोन बलदंड बुरूजात दडवलेवल्या प्रवेशद्वारापाशी येतो.
बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर समोरच सदरेची इमारत आहे. आज ती पूर्णपणे नव्याने
बांधून काढलेली आहे. समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे. विहीर बऱ्याच
प्रमाणात बुजलेली आहे. जवळच अंधारकोठडी पहायला मिळते. गडाच्या सर्वोच्च
माथ्यावरून दुसऱ्या टप्प्यातली तटबंदी आणी माचीचा परिसर फार सुंदर दिसतो.
समोरच दिसणारा सीतामाईचा डोंगर तसेच शंभू महादेव डोंगररांग फार सुंदर
दिसतो. संतोषगडावरून सीतामाईच्या डोंगरातून एक वाट वारूगडावर येते.
बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक अप्रतिम टाके पहायला मिळते. या टाक्यातील
पाणी सुमधुर आणी चवदार आहे. टाके भुयारी असून त्यात बरेच खांब आहेत, तसेच
तीन चार कप्पे ही आहेत.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment