वैभव महाराष्ट्राचे!
नाशिक आणी जळगाव जिल्ल्याच्या सीमारेषेवर अजिंठासातमाळ डोंगररांगेत राजदेहेर उर्फ ढेरी उर्फ देहेर हा वनदुर्ग वसलेला आहे. राजदेहेरवाडी हे पायथ्याचे गाव गाठण्यासाठी मनमाड - नांदगाव - नायडोंगरी - हिंगणेदेहेरे अशा गाडी मार्गाने जाता येते. राजदेहेरवाडी गावापासुन साधारणपणे ४ कि.मी. अंतरावर असलेल्या गंगानंदगिरी आश्रमापुढे असलेल्या महादेव मंदिरापासुन गडावर जाणारी पायवाट आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असुन येथे एक मठ ही आहे. मंदिराच्या आवारात काही शिल्प पहायला मिळतात. मठात रहाण्याची तसेच जेवणाची सोय होते. राजदेहेर गडाच्या माथ्यावरून पितळखोऱ्याचे अप्रतिम दृश्य पहायला मिळते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमाचे ही नयनरम्य दृश्य पहायला मिळते. गडपरिसरात डोंगर रांग आणी जंगल दाट असल्यामुळे गडावर वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यात प्रामुख्याने पट्टेरी वाघ!
मठातील शंभुमहादेवाचे दर्शन करून हरहर महादेव! म्हणत गडाकडे निघायचे. ढेरी गडाची एक सोंड मंदिरापर्यंत आलेली असुन दुसरी सोंड विरूध्द बाजूस लांबवर देहेरवाडीकडे पसरलेली आहे. मंदिराशेजारील ओढ्यातून गडाकडे जाणाऱ्या वाटेच्या सुरवातीला उघड्यावरच एक भग्न श्री गणेश मुर्ती व नंदी यांचे दर्शन होते. या ठिकाणी वाटेला दोन फाटे फुटतात. यातील डावीकडील वाट किल्ल्याच्या सोंडेला उजवीकडे ठेवत वळसा घालुन मागील खिंडीतून गड माथ्यावर चढते तर सरळ जाणारी वाट गडाच्या दोन डोंगरामधील घळीतुन गडावर जाते, पण ही वाट जास्त मळलेली नसून ढोरवाटा चकवा देतात. तर याच वाटेने गेल्यास गडाच्या मुख्य दरवाजातून गडप्रवेश होतो. राजदेहेर किल्ला दोन डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याच्या दोन सोंडेमध्ये असलेल्या खिंडीतील उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजा आहे. घळीतून गडमाथ्यावर जाताना वाटेत ढासळलेल्या तटबंदीचे व दरवाजाचे अवशेष दिसतात. घळीच्या उजवीकडे कातळात खोदलेली लेणी पहायला मिळते, लेण्याच्या वरील बाजुस एक लहान गुहा कोरलेली आहे. गुहेच्या वर उतारावर खडकात खोदलेले पाणी टाके आहे. खिंडीमध्येच व्यालमुख शिल्प कोरलेले भग्न स्तंभ व कोरीव दगडी हे मंदिराचे अवशेष पहायला मिळतात. गडमाथा दोन डोंगराने व्यापलेला असून, उजवीकडील डोंगर आकाराने लहान असुन डावीकडील डोंगरावर मुख्य किल्ला तसेच उंचवट्यावर बालेकिल्ला पहायला मिळतो.
उजवीकडील गडमाथ्यावर
उंचवट्याखाली उध्वस्त झालेले एक लेणे, वास्तुचे चौथरे, तलाव आणी एक भलामोठा
बुरूज पहायला मिळतो. या बुरुजाच्या डावीकडे किल्ल्याचा दुसरा उध्वस्त
दरवाजा आहे. डावीकडील गडमाथ्यावर कातळात कोरलेले एक दोन खांबी लेणे,
त्याच्या शेजारी एक पाणी टाके आणी एक गुहा पहायला मिळताते. त्यापुढे अजुन
एक पाणी टाके त्याच्या खालील भागात चार खांब असलेले टाके दिसते. गडाच्या
सपाट माथ्यावर पाणी टाके, तलाव असून बाजूलाच शिवलिंग आणी नंदी उघड्यावर
विराजमान आहेत. थोडे पुढे दगडात खोदलेल्या पादूका व त्याशेजारी १०ते १२
खळगे पहायला मिळतात. माचीच्या निमुळत्या टोकावर भगवा झेंडा मानाने फडकत
आहे. गडाच्या सर्वोच्च भागावर बालेकिल्ला बांधलेला आहे. बालेकिल्ल्याच्या
तटबंदीच्या अवशेषात आजही पाच बुरूज पहायला मिळतात. ढासळलेल्या दरवाजातून आत
शिरल्यावर उध्वस्त वाड्याचे आणी वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. येथुन
खाली घळीकडील दरवाजाकडे उतरताना कोरलेल्या पायऱ्या व वास्तुंचे चौथरे
दिसतात. पिनाकेश्वर महादेव मंदिराकडून एक वाट गडावर येते. या वाटेवर
असलेल्या एका लहान दरवाजातून गडप्रवेश होतो, हा दरवाजा पकडून गडावर
येण्यासाठी एकूण तीन दरवाजे आहेत. दरवाजाच्या उजवीकडे असलेल्या बुरुजावर एक
कबर आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment