दुर्लक्षित दुर्गांचा अपरिचित इतिहास
लेख क्र. १
दुर्ग : हरिहरगड
हरिहर गडाचे ऐन धुक्यात झालेले प्रथम दर्शन म्हणजे साक्षात देवाधिदेव महादेवाचे दर्शन. ज्यावेळेस आयुष्यात पहिल्यांदा हरिहर गड पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस कातळी जिन्यापाशी पोहोचल्यावर जी काही धुक्यात हरवलेली वाट दिसली, अचानक त्यावेळेस शिवतांडव स्तोत्रातील खालील ओळी मनाच्या पटलावर तांडव करू लागल्या.
जटाकटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि।
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम: ॥२॥
अर्थात...
ज्या महादेवाचे मस्तक अवखळ, अलौकिक गंगेच्या धारांनी सुशोभित आहे.
जी गंगा महादेवाच्या जटांमध्ये अवखळपणे वाहत आहे.
ज्या महादेवाच्या मस्तकावर सदा चमकदार अग्नी प्रज्वलित आहे.
अशा ह्या महादेवाने चंद्रकोर एखाद्या दागिन्याप्रमाणे घातली आहे.
असा क्षणभर भासच मला कातळी चढण पाहताना झाला. अदभूत, आश्चर्य, अतिप्रचंड
आणि अतिबेलाग जर काही असेल तर हरिहर गडाचा हा कातळ. जणूकाही ह्या दुर्गाला
आशिर्वाद देऊन त्याच्या पाठीशी त्रंबकेश्वर विसावला आहे.
खरंच करावे तितके थोडे वर्णन कमीच आहे हरिहर गडाचे.
तर मित्रांनो नमस्कार मी तुषार भोर आपल्या नव्या आगळ्यावेगळ्या लेखमालेत
म्हणजेच "दुर्लक्षित दुर्गांचा अपरिचित इतिहास " या मध्ये आपले सर्वांचे
स्वागत करत आहे.
मित्रांनो सह्याद्री म्हटला की मला कायम नाशिक मधील
पर्वतच प्रकर्षाने आठवतात. खरंच नाशिक शहराला सह्याद्रीच्या अप्रतिम आणि
विराट अशा कड्यांच जणू काही कोंदनचं लाभलंय. आणि याच रांगांमध्ये अगदी
हिऱ्यासारखे लपलेत असंख्य किल्ले. प्रत्येक किल्ला दुसऱ्यापेक्षा भिन्न,
त्यांपैकीच आहे हरिहर किंवा हर्षगड. आज आपण उलगडणार आहोत हरिहर गडाचा
इतिहास,अंदाजे संदर्भ आणि येथील प्रचलित दंतकथा.
हरिहर गडाचे स्थान
हे सह्याद्रीतील त्रिंबक या उपरांगेत आहे जी इगतपुरीच्या पूर्व -पश्चिम
पसरलेली आहे, गडावर येण्यासाठी दोन वाटा आहेत, एक निरगुडपाडा ह्या गावातून
तर दुसरी हर्षेवाडी ह्या गावातून त्यांपैकी निरगुडपाडा ह्या गावातून येणारी
वाट काहीशी दमवणारी आहे, तर दुसरी काहीशी सोपी . प्रथम टप्प्यातील चढाई
संपल्यानंतर जी वाट गडाकडे म्हणजेच उजवीकडे जाते अगदी त्याच्या विरुद्ध
दिशेला एक वीरगळ आहे आणि तेथून बरोबर ३० पावलांवर सुंदर असा स्वच्छ
पाण्याचा पुष्करणी तलाव आहे आणि शेजारी महादेवाचे मंदिर आहे, महादेवाचे
दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरावे . साधारण १० मिनिटांची काहीशी जंगलातुन
जाणारी वाट आपणास हरिहर गडाच्या पायथ्याशी आणून सोडते,
अशाप्रकारे
ह्या दोन्हीही वाटा कातळापाशी येऊन मिळतात आणि येथूनच गडाचे विराट रूप
ध्यानात येते, कातळाला भिडण्यापूर्वी एकदा नजर वर करून पाहिल्यास एका
नजरेच्या टप्यातही मावणार नाही अशी भयंकर आणि दुर्धर गडावर जाणारी एकमेव
वाट नजरेस पडते.
हिच सरळसोट वाट जणूकाही आपल्याला आता स्वर्गातच घेऊन जाणार असा भास क्षणभर होतो.
साधारण 15 मिनिटांच्या खड्या चढाई नंतर महाद्वार नजरेस पडते, खऱ्या
अर्थाने त्यांस महाद्वार म्हणणे उचित वाटत नाही कारण हे द्वार अतिशय अरुंद
आहे एका वेळेस ह्या वाटेने एकच जण प्रवेश करू शकतो. किल्याच्या वाटेची रचना
पाहिल्यावर महाद्वाराचे महत्व कळते, कारण अशा ह्या खड्या जिन्याच्या
वाटेवरून चढून आल्यानंतर शत्रूस सहजासहजी प्रवेश मिळू नये हा उद्देश असावा.
महाद्वार ओलांडल्यानंतर एकमेव वाट डाव्या बाजूला वळते, ह्या वाटेची थोडी
पडझड झाली आहे त्यामुळे पुन्हा नवीन वाट कोरल्याचे स्पष्ट संकेत इथे मिळतात
तसेच हौशी पर्यटकांनी इथे थोडे सांभाळावे कारण निष्काळजी महागात पडू शकते.
येथून पुढे गेल्यावर वाट जरा वळून किल्याच्या दुसऱ्या पण सुरेख अश्या
कोरीव द्वारात नेऊन सोडते, हा दरवाजा पूर्णपणे कातळाला भुयार करून तयार
केला आहे खरंच खूपच अप्रतिम शिल्पकलेचा आविष्कार इथे पाहण्यास मिळतो. हा
दरवाजा ओलांडल्यावर थोडीशी चढण आणि मग आपण पोहचतो किल्ल्याच्या
माथ्यावर.....
हरिहर गडाची नोंद कागदोपत्री इतिहासात निजामशाही
कालखंडात सापडते. साधारणतः १६३६ मध्ये शहाजी राजांनी हा किल्ला जिंकून
घेतल्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतर शिवकाळात १६७० मध्ये मोरोपंत पिंगळेंनी
हा गड जिंकून घेतला होता. त्यानंतर जवळजवळ १९ वर्षे हा किल्ला स्वराज्यात
होता. ८ जानेवारी १६८९ ला हा किल्ला मुघल सरदार मातब्बर खानाने जिंकला.
शेवटी १८१८ मध्ये किल्ल्याचा पाडवा इंग्रजांनी केल्याचा पुरावा मिळतो.असे
म्हटले जाते १८१८ साली देशातील मराठा सत्येचा अस्त झाल्यावर म्हणजेच शनिवार
वाड्यावर युनियन जॅक फडकल्यावर हे राज्य जेव्हा इंग्रजांच्या घशात गेले
त्यावेळेस स्वराज्यातील सर्वच किल्यांच्या वाटा इंग्रजांनी तोफेच्या
सहाय्यानी उध्वस्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतला, त्यावेळेस ब्रिटिश
तोफखान्याचा प्रमुख एंड्रीज हा जेव्हा या गडाच्या पायथ्याशी आला त्यावेळेस
हे कोरीव शिल्प बघून तोही अक्षरशः गडाच्या प्रेमात पडला आणि त्याने हे
खोदीव शिल्प उध्वस्त करण्याचे टाळले म्हणून आज ते आपणांस पाहण्यास मिळते.
हरिहर गडाच्या बांधकामाबद्दल जास्त अशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही...
गोंडा घाटातून येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि टेहाळणी साठी हा
किल्ला बांधल्याचे वाचनास मिळते परंतु नक्की कोणी हा किल्ला बांधल्याचे
पुरावे उपलब्ध नाही, पण किल्याच्या बांधकामाकडे आणि नाशिक जिल्ह्यातील
बरेचशे किल्ले हे ह्याप्रकारे बांधलेले असल्याचे दिसतात तसेच ह्या
किल्ल्याचे भौगोलिक स्थान यावरून हा किल्ला सातवाहन काळात बांधला असावा,
कारण अशाप्रकारे कातळात कोरलेले जिने आणि किल्ल्यावरील मार्ग बांधल्याचा
इतिहास सातवाहन काळात मिळतो तसेच सातवाहन साम्राज्यात जीर्णनगर म्हणजेच
जुन्नर, तेग (तगर ) आणि नाशिक हि व्यापारी बाजरपेठ असलेली शहरे उदयास आली
होती त्यामुळे कोकणातून वेगवेगळ्या वाटा सातवाहन साम्राज्यात येण्यासाठी
ह्या शहरांना जोडले गेले असल्याने वरील वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी
अशाप्रकारच्या किल्ल्यांची निर्मिती झाली होती असा शिलालेख नाशिक मधील
भारतीय पुरातत्व खात्याला मिळाले आहेत तसेच वायुपुराणात सातवाहन काळात
गौतमीपुत्र सात्यकर्णी याने शिल्पकलेस प्रोत्साहन दिल्याचे दिसते म्हणूनच
हरिहर गडाची निर्मिती प्राथमिक अंदाजावरून तरी सातवाहन काळातील वाटते.
याबरोबरच या भागातील स्थानिक लोकांमध्ये एक सुरस कथा प्रचलित आहे.
एकदा मुघल हा किल्ला जिंकण्यासाठी वेढा लावून बरेच दिवस बसले. बऱ्याच
दिवसांच्या लढ्या नंतर जेव्हा किल्ल्यावरील धान्यसाठा संपु लागला त्यावेळेस
किल्ल्याचा किल्लेदार हा किल्ला शत्रूकडे देण्यास तयार झाला, नेमके
त्याचवेळेस त्याच्या आईने त्याला एक युक्ती करण्यास सांगितली.
किल्लेदाराच्या आईने सांगितल्या प्रमाणे किल्ल्यावर आमटी भात मोठ्या
प्रमाणावर रांधला किंवा शिजवला आणि मग किल्ल्याच्या तटबंदीवरील सैन्याला
आज्ञा दिली की त्यांनी नुसते मशाली घेऊन ह्या तटाकडून त्या तटाकडे धावायचे.
तसेच वरून पत्रावळीला आमटी भात चोपून खाली दरीत फेकल्या. त्यामुळे झाले
असे की खालच्या मुघल सेनापतीला असे वाटले की आपण इतक्या दिवस वरचे
उपासमारीने किल्ला खाली करतील म्हणून वाट पाहतोय पण वर तर जष्ण चालू आहे
मग अशाप्रकारे सर्व शत्रू सैनिक वेढा उठवून निघून गेले.....
ही झाली दंतकथा जिला काहीही लिखित आधार नाही पण नक्कीच सुरस आहे.
गडाच्या माथ्यावर विशेष अशी बांधकामे नाहीत, किल्ल्याच्या
डाव्याबाजूने चढून वर आल्यावर काही पडक्या भिंतींचे तसेच तटबंदीचे अवशेष
दिसतात आणि पुढे घडीव दगडात बांधलेला तलाव मिळतो, तलाव ओलांडल्यावर पुढे
किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला एक छोटीशी दगडी इमारत आहे तिथे बहुदा शासनाने
धान्यकोठार अशी पाटी लावल्याचे दिसते परंतु हि इमारत व्यवस्थित पाहिल्यावर
हे धान्यकोठार नसून दुसरीच कुठलीतरी इमारत असल्याचे लक्षात येते ते पुढील
कारणाने
१) धान्यकोठार कधीच एव्हडे छोटे नसते
२) जर आपण गृहीत धरले कि हे धान्यकोठार आहे तर कोठाराचा दरवाजा इतका छोटा कसा (२×२.५फूट )
३) छताला हवा खेळती राहण्यास छिद्रे नाहीत जी अंबरखान्यास पाहण्यास मिळतात
४) ह्या इमारतीच्या शेजारीच काही फुटांवर पाण्याचं खोदीव टाकं आहे ज्याची
ओल कोठाराच्या जमिनीला आलेली आहे ज्यामुळे साठवलेले धान्य सडू शकते....
त्यामुळे आधीच किल्ल्यांबाबतीत उदासीन असलेल्या शासनाने माहिती फलक जरूर
लावावेत परंतु इतिहासतज्ञ लोकांनकडून माहिती घेतल्यास सामान्य पर्यटकांची
दिशाभूल होणार नाही...
धान्यकोठार बघून झाल्यावर किल्ल्याच्या उत्तरेला
एक ५० ते ६० फुटी शिखर लक्ष वेधून घेते, ह्या शिखरावर जाण्यासाठी थोडी
कसरत करावी लागते... शिखराचा माथा सपाट आहे आणि तो जाणीवपूर्वक केल्याचे
लक्षात येते, अशा प्रकारच्या शिखराचा उपयोग किल्ल्यावरील सर्वात उंच जागा
म्हणून टेहाळणी बुरुंज म्हणून करतात, या माथ्यावरून किल्ल्याच्या चारही
बाजूला नजर पोहचते तसेच अशा जागी तोफ ठेवायची व्यवस्था केलेली असायची. ह्या
जागेवरून हरिहर गडाच्या उत्तरेकडून पूर्वपश्चिम पसरलेली सह्याद्रीची
त्रिंबक हि उपरांग व ह्या रांगेतील भास्करगड त्रिंबकगड, अंजनेरी, गडगडा,
कावनई असे अनेक किल्ले नजरेस पडतात.
हरिहर गडाचा घेर आटोपशीर आहे
पायथ्याकडून सरळसोट, आयताकृती वाटणारा गड वरून त्रिकोणी आहे, गडावर
पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत पण स्वच्छते अभावी
न पिणे योग्य तसेच निवाऱ्या योग्य जागा नाही परंतु एकदा मुक्काम करावा असा हा किल्ला जरूर आहे.
नाशिक मध्ये साल्हेर असो, सालोटा असो किंवा त्रिंगलवाडी असो हे
सर्व किल्ले धडकी भरवतात ते त्याच्या बांधकामामुळे आणि नैसर्गिक रचनेमुळे
त्यामुळे दुर्गवेड्यांना सह्याद्रीचे हे सह्यकडे कायमच साद घालत नसतील तर
नवलच.
तर मित्रांनो सदर लेख कसा वाटला जरूर कळवा आणि आपल्या सखा
सह्याद्री page ला like, share आणि comment करा. लवकरच भेटू पुढील भागात
एका नव्या किल्ल्यासोबत तोपर्यंत
लेखनसिमा.
श्री शिव सेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
Social media वर follow करण्यासाठी
👇👇👇👇
# Blog - tusharssg.blogspot.com
# Youtube - awaazsahyadricha
# Facebook - sakha sahyadri giryarohak
No comments:
Post a Comment