वैभव महाराष्ट्राचे!
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगड आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या भोरप्या नावाच्या डोंगरावर किल्ल्याची बांधणी झाली आहे. समुद्र सपाटीपासून १०८० मीटर उंची असलेला हा गिरिदुर्ग सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर आहे. महाबळेश्वरहून पोलादपूरला जाताणा आंबेनळी घाटावरील कुंभरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासात प्रतापगडला जाता येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले. कोकण व वाई प्रांत यांना जोडणार्या वाटेवरील मोक्याची जागा पाहून सौरक्षणासाठी इ.स. १६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण केले. दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफजलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर उडवले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स. १६५९ ते इ.स. १८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स. १६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर (संध्याकाळी ८ वाजता) बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी (सकाळी ६ वाजता) उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. वाटेत तटाला उजवीकडे चोर दरवाजा आहे तसेच प्रशस्त बुरूजाच्या डावीकडे एका पाठोपाठ एक असे दोन दरवाजे आहेत. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच छत्रपती शिवाजी राजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.
केदारेश्वर मंदिराच्या
मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे
बगीचाच्या मधोमध छत्रपती शिवाजी राजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या
पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच
शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन
तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्याचे विहंगम दृश्य दिसते.
किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्याचा दिंडी
दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे
सूर्य बुरूज हे बुरूज आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन
तळी आहेत. तेथून मधू मकरंदगड व कोयनेचे खोरे सुंदर दिसते. प्रतापगडा पासून
जवळच कोयनेवर शिवकालीन दगडी पुल असून तो आजही वापरात आहे. शेजारीच गणेश
मंदिर आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment