वैभव महाराष्ट्राचे!
अजिंठा सातमाळ रांगेवर आणी मार्कंड्या गडाच्या जवळ
असलेला असाच एक छोटेखानी गिरीदुर्ग म्हणजे कण्हेरगड! गिर्यारोहकांना फारसा
परिचित नसलेला; पण इतिहासातील एका पराक्रमगाथेमुळे आपले नाव
सुवर्णाक्षरांत कोरून ठेवणारा असा हा गड. नाशिकहून थेट कण्हेरला जाण्यासाठी
दोन मार्ग आहेत. नाशिकहून ओतूर मार्गे कण्हेरवाडी या पायथ्याच्या गावातून
किंवा वणी - नांदुरी - कळवण रस्त्यावरचे
आठंबा हे गाव गाठून तिथून सादड विहीरमार्गे कण्हेरावर जायचे. सादड विहीर
किंवा कण्हेरवाडी, कुठूनही गेले तरी कण्हेरा आणि त्याच्या शेजारचा डोंगर
यांच्यातली खिंड चढावीच लागते. खिंडीतून एकच वाट कण्हेराच्या माथ्यावर
जाते. खिंडीतून आव्हान देतो तो कण्हेरगडचा खडा चढ. चढाच्या शेवटी एक बुरूज
आहे; या बुरुजापाशी काही खोदीव पायऱ्या आहेत. हा बहुधा गडाचा उद्ध्वस्त
दरवाजा असावा. इथून आपण पुढे आलो, की गडाचा माथा लांबवर दिसू लागतो. या
वाटेवर पाण्याचे एक टाके असून, त्याच्याच पुढे उजवीकडे गडाचे छोटेसे नेढे
आहे. कण्हेरगडावरची ही सर्वांत सुंदर जागा असून, इथे बसून आजूबाजूच्या
डोंगररांगा पाहण्यात एक वेगळेच सुख आहे. नेढ्यापासून काही पायऱ्या चढून आपण
वर आलो, की उजवीकडची वाट नेढ्याच्या माथ्यावर जाते, तर डावीकडची वाट
बालेकिल्ल्यावर. बालेकिल्ल्यावर दोन छोटे दगडी स्तंभ उभे राहिलेले दिसतात,
त्यांचे प्रयोजन मात्र कळत नाही.
बालेकिल्ल्यावर प्रवेश करताक्षणीच कण्हेराचे विस्तीर्ण पठार नजरेत भरते.
कण्हेराच्या माथ्यावर सुरवातीलाच पाण्याची काही टाकी आहेत. पुढे गडाच्या
मुख्य पठारावर उद्ध्वस्त वास्तूंचे अनेक अवशेष पसरलेले आहेत. गडाच्या
उजव्या बाजूच्या कड्याजवळ एक झेंडा असून, त्याच्या जवळच एक वृंदावन आहे.
जवळच एक पडक्या वाड्याचे बांधकाम दिसते. गडमाचीला धोडप किल्ल्यासारखा खंदक
आहे. कण्हेराच्या माथ्यावरून सातमाळ रांगेचे अप्रतिम दर्शन होते. अचला,
अहिवंत, सप्तशृंगी, मार्कंड्या, मोहनदरी, धोडप, रवळ्या - जवळ्या, इखारा,
कांचन - मंचन, इंद्राई, कोळदेहेर, राजदेहेर, चौल्हेर, प्रेमगिरी, भिलाई,
दीर - भावजय डोंगर, इंद्रमाळ इतका विस्तीर्ण नजारा दिसतो; वातावरण स्वच्छ
असेलतर डोलबारी रांग साल्हेर, सालोटा, हारगड, मोरा व मुल्हेर सुद्धा
दिसतात. गड भटकंती करताना पराक्रमी इतिहासाचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.
सुलतान ढावा .......
इ. स. १६७१ मध्ये ऑक्टोबर महिन्यात
औरंगजेबाच्या आदेशावरून दिलेरखान मुघल सैन्यासह कण्हेराच्या दिशेने चालून
येऊ लागला. त्या वेळी कण्हेराचा किल्लेदार होता रामाजी पांगेरा. अफजलखान
वधाच्या वेळी प्रतापगडावरून इशारा मिळताच ज्या पाच मराठा सरदारांनी
आदिलशाही सैन्यावर प्रचंड हल्ला चढवला, त्या पाच सरदारांमध्ये कमळोजी
साळुंके, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कोंडाजी वरडवले यांच्याबरोबर रामाजी
पांगेराही होता. कवींद्र परमानंदांनी शिवभारतात रामाजीला "अग्निसारखा शूर'
असे म्हणून गौरवले आहे. कण्हेरगडावर त्या वेळी हजारच्या आसपास मावळे होते.
रामाजीने कण्हेरगडावरून मुघलांचा सेनासागर पहिला. आता युद्ध अटळ आहे हे
त्याला कळून चुकले होते. मुघल सैन्य आता गडाच्या जवळ येऊन पोचले होते.
रामाजीने तीनशे मावळे गडावरच ठेवले. सिंहाच्या काळजाचे सातशे मराठे वीर
प्राण पणाला लावून कण्हेरगडाचे रक्षण करायला सर्वार्थाने सिद्ध झाले होते.
उंचीने अगदीच नगण्य असलेला हा किल्ला आपण काही तासांत
जिंकून घेऊ असा विचार दिलेरखानाच्या डोक्यात सुरू होता आणि अचानक गडाचे
दरवाजे उघडले गेले. हर हर महादेव अशी रणगर्जना प्रचंड आवाज करत आसमंतात
घुमली आणि हातात नंग्या तलवारी घेतलेल्या सातशे उघड्या बोडक्या काळ्याभिन्न
आकृत्या वीज कोसळावी त्या वेगाने मुघल सैन्यावर तुटून पडल्या. रामाजी आणि
त्याच्याबरोबरच्या मराठ्यांचा तो आवेश बघून मुघल सैन्याचा ठोकाच चुकला.
महाभयंकर रणकंदन सुरू झाले. मराठ्यांच्या तलवारी सपासप मुघल सैन्याला कापत
सुटल्या होत्या. मराठ्यांना आवरणे मुघलांना कठीण जाऊ लागले. सभासदाने तर
आपल्या बखरीत या लढाईविषयी लिहून ठेवले आहे, की ‘टिपरी जैसी सिमगीयाची
दणाणते तैसे मराठे कडाडले.’ मराठ्यांनी पराक्रमाची शिकस्त चालवली होती.
रामाजीच्या अंगात तर साक्षात रणचंडिकाच संचारली होती. रामाजीचा तो आवेश
बघून दिलेरखान थक्क झाला आणि पुरंदरच्या वेळी मुरारबाजीचा रणसंग्राम बघून
"या अल्ला, ये कैसा सिपाही तुने पैदा किया', असे म्हणत तोंडात गेलेली
त्याची बोटे आज रामाजीचा रणावेश बघून पुन्हा एकदा तशीच तोंडात गेली.
संख्येने कमी असूनही मराठे मागे हटायला तयार नव्हते. तीन तास कण्हेरगडाच्या
परिसरात हे प्रचंड रणकंदन सुरू होते. अखेर दिलेरखानाच्या सैन्यातल्या
पठाणांनी मराठ्यांना घेरले. एका एका मराठ्याला वीस-वीस, तीस-तीस जखमा
झाल्या. दिलेरखान या सगळ्या प्रकाराने मात्र अक्षरशः स्तिमित झाला होता.
अवघ्या सातशे मावळ्यांनी बाराशे मुघलांना नरकाचा रस्ता दाखवला. रामाजी आणि
त्याच्या मराठ्यांनी शौर्याची कमाल केली. विस्मृतीत गेलेला कण्हेरगड
मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाने इतिहासात अमर झाला. सुवर्णाक्षरांत कोरला
गेला. रामाजी पांगे यासारख्या इतिहासात प्रचंड मोठे योगदान देऊनही
विस्मृतीत गेलेल्या नरवीराचा पराक्रम आठवत कण्हेरगड उतरायला लागायचे.
किल्ले कण्हेरगड, ता. कळवण, जि. नाशिक
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment