Followers

Monday, 18 May 2020

किल्ले कमळगड

वैभव महाराष्ट्राचे!

महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने कोळेश्वर डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे, तोच किल्ले कमळगड! दक्षिणेकडे कृष्णानदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार गिरीदुर्ग उभा आहे. छोट्याश्या कमळगडाच्या भटकंती साठी पुण्यातून वाई गाठावी. वाईतून खावली किंवा वायगाव मार्गे वासोळे हे पायथ्याचे गाव गाठावे. गावामागे कमळगड आणी त्याच्या उजवीकडील डोंगर यांच्या मधली खिंड दिसते. गावातून काही अंतरापर्यंत गाडी जाते, नंतर कच्च्या रोडने चालत जाऊन खिंडीकडे जाणाऱ्या मळलेल्या वाटेने अंगावरील चढाई चढून खिंड गाठावी. खिंडीतल्या धारेवरून डावीकडे वळून गोरक्षनाथाचे पुरातन मंदिर गाठावे. कमळगड माचीच्या पश्चिम टोकावर गोरक्षनाथ मंदिर आहे. मंदिर परिसरात एक वेगळेच चैतन्यमय वातावरण असते, तसेच बऱ्याच देवतांच्या पुरातन मुर्ती दर्शन देतात.

कमळगड माचीवर सर्वत्र दाट वनराई असून गोरक्षनाथ मंदिरापासून एक मळलेली वाट धनगराच्या घरापर्यंत जाते. धनगराच्या घरीच पाण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. या झापापासूनच गडमाथ्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. वाटेवर तटबंदीचे अवशेष दिसतात. गडकातळास पडलेल्या मोठ्या भेगेतून चढताना पुढे पायऱ्या लागतात. याच ठिकाणी कधीकाळी तटबंदी युक्त दरवाजा असल्याचे अवशेष पहायला मिळतात. समुद्र सपाटीपासून १३७५ मीटर उंचीवरील गडमाथ्याच्या सपाटीवरून आजुबाजूचा डोंगरदऱ्यांचा सुंदर मुलूख आपल्या दृष्टीपथात येतो. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा - नवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०५० फूट लांबीचे एक रूंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत. हीच ती गेरूची किंवा कावेची विहीर, उंच अशा या ५० ते ५५ पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहोचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.

गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झालेली आहे. तिच्यावर बुरूजाचे थोडेफार बांधकाम आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडे गवतात लपलेले चौथऱ्याचे अवशेष दिसतात. नैऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोयरिक कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. मूळ मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्याने प्रसिद्ध झाले. थोर संत कवी वामन पंडित यांचीही जवळच भोमगावाला समाधी आहे.

किल्ले कमळगड, ता. वाई, जि. सातारा

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment