वैभव महाराष्ट्राचे!
अजिंठा सातमाळ डोंगर रांगेत बलाढ्य अहिवंत गडाच्या पुर्वेस त्याचा छोटासा जोड दुर्ग बुध्यागड आहे. समुद्र सपाटी पासून १२०० मीटर उंची असलेला हा गिरीदुर्ग एका गोलाकार सुळक्यावर बांधला आहे. या अप्रतिम गडाच्या भटकंतीसाठी नाशिकमार्गे वणी गाठावे. नांदुरी रस्त्याचा घाट चढून गेल्यावर लगेच डावीकडे दरेगावला रोड आहे. दरेगावात मुक्कामा साठी हनुमानाचे प्रशस्त मंदिर आहे. गावाच्या बाहेरून एक ठळक वाट डावीकडे असणाऱ्या डोंगरसोंडे पर्यंत जाते. येथुन वर चढुन गेल्यानंतर आपण एका खिंडीत पोहोचतो. वाट थोडी जंगलात शिरून थेट अहिवंत आणी त्याचा जोड दुर्ग असणारा बुध्या यांच्या मधील खिंडीत जाते. खिंडीपासून एक वाट अहिवंतवर जाते व दुसरी बुध्याच्या माथ्यावर जाते.
बुध्यावर चढाई साठी कातळात कोरलेली पायऱ्यांची वाट आहे. एक
दोन ठिकाणी पायऱ्या तुटल्यामुळे अवघड झाली आहे. पायऱ्या चढून गेल्यावर
बुरूजयुक्त तटबंदी आहे. पडक्या दरवाजातून गडप्रवेश होतो. तटबंदीच्या कडेला
पाण्याचे टाके दिसते. तसेच तटबंदीच्या कडेने पुढे चालत गेल्यावर पाण्याची
सरळ रांगेत तीन टाकी दिसतात. अजून पुढे गेल्यावर गडाला खिंडीने चिकटलेला एक
सुळका दिसतो. त्याच्या कडील टोकावर भला मोठा दनकट बुरूज आहे. गडाचा
सर्वोच्च माथा गोलाकार असून माथ्यावर राजवाड्याचे अवशेष तसेच तीन घरांची
जोती आणी पाण्याची दोन टाकी दिसतात. येथून पुर्वेस सप्तशृंगी, मार्कंड्या,
जवळ्या - रवळ्या, धोडप हे किल्ले दिसतात. पश्चिमेस अहिवंत दिसतो, तर
ईशान्येस मोहनदरी दिसतो. अहिवंत गडावरून त्याचा छोटा पण अप्रतिम जोड दुर्ग
बुध्या सुंदर दिसतो.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment