Followers

Monday, 18 May 2020

किल्ले धारूर

वैभव महाराष्ट्राचे!

बालागाटचे डोंगर रांगेवर गिरीदुर्ग व स्थलदुर्गाचे मिश्रण असलेला अप्रतिम किल्ले धारूर! धारूर हा मोठा व प्रशस्त किल्ला. धारूर गावाला पोहचण्यासाठी पुणे - अहमदनगर - जामखेड - मांजरसुंबा - केज - धारूर असा लांबचा प्रवास करावा लागतो. मुक्कामास मांजरसुंबा येथिल कपिल धार किंवा धारूर मधील अंबाचोंडी माता मंदिर छान आहे. धारूर गावाच्या उत्तरेस गावाबाहेर किल्ला असून एस टी स्टॉन्ड च्या समोरून रोड किल्ल्याकडे जातो. केज कडून धारूरला जाताना थोडे अलिकडे तीन कबरी लक्ष वेधून घेतात. बांधकाम चांगल्या अवस्थेत असून दरवाजावर शिलालेख आहे.

धारूर किल्ल्याची तटबंदी, बुरूज, दरवाजे चांगल्या स्थितीत असून पडझड झालेल्या ठिकाणी डागडुजीचे काम चालू आहे, ते पाहून समाधान वाटते. धारूर किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला असून मुख्य व प्रशस्त दरवाजा दक्षिणेस आहे. याच बाजूला किल्ल्याचा खंदक अाहे, कारण किल्ल्याची हि बाजू सपाट जमिनीला जोडलेली आहे. साधारण किल्ल्याच्या अर्ध्या परिघावर खंदक आहे. उरलेल्या अर्ध्या बाजूस खोल दरी आहे. या नैसर्गिक भूरचने मुळेच हा किल्ला स्थलदुर्ग व गिरिदुर्ग यांचे अप्रतिम मिश्रण आहे. खंदकात बांध बांधून तयार केलेले प्रशस्त चार तलाव आहेत. त्यातील एक तलाव किल्ल्याच्या तटबंदीत असून त्याचे बांधकाम अप्रतिम आहे. खंदकाकडील एका बुरूजावर एक शिलालेख व काही शिल्पे आहेत. त्यात हत्ती, शरभ व लढाई करणारी दोन मानसे आहेत. बुरूजात लपवलेल्या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश होतो. पुढे दुसरी तटबंदी असून त्यात दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाजा शेजारी अगदी छोटा दरवाजा आहे. आत सैनिकांच्या देवड्या आहेत. त्यांच्या छतावरील नक्षीकाम सुंदर आहे. दुसऱ्या तटबंदीत तीन खुपच उंच व मोठा घेर असलेले बुरूज आहेत. या बुरूजात रहाण्यासाठी खोल्या व दुरवर लक्ष ठेवण्यासाठी कमानी आहेत. तीन बुरूजांच्या मध्यभागी प्राचीन पद्धतीने दगडगोळा फेकन्यासाठी यंत्रणा बांधलेली आहे. किल्ल्यात राजवाडा, बांधीव तलाव, मज्जीद व ईतर वास्तूंचे बरेच अवशेष आहेत. तटबंदीवरून गड फिरताना उत्तरेस तीसरा दरवाजा असून तो दोन बुरूजात लपविलेला आहे. तसेच खंदकातील तलावाकडे जाण्यासाठी एका बुरूजातून छोटा दरवाजा आहे.

पावसाळ्यानंतर धारूरला जाणे खुपच योग्य होईल, कारण हिरव्यागार हिरवळीत किल्ला खुपच सुंदर दिसतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले अंबाचोंडी माता मंदिर किल्ल्यापासून सहा ते सात कि. मी. वर आहे. डोंगराच्या कपारीत नदीच्या काठी असलेले अंबा माता मंदिराचा परिसर निसर्गरंम्य आहे. दगडात कोरलेली मातेची मुखमुर्ती सुंदर आहे. शेजारी महादेवाचे मंदिर आहे. अंबाचोंडी माता मंदिराचे बांधकाम दगडी असून समोर दिपमाळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शुर सरनोबत नेताजी पालकर यांना पकडून धारूरच्या किल्ल्यात ठेवले होते. येथूनच त्यांना औरंगजेब कडे पाठविण्यात आले.

किल्ले धारूर, ता. धारूर, जि. बीड

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment