Followers

Monday, 18 May 2020

किल्ले सुरगड

वैभव महाराष्ट्राचे!

रायगड जिल्ह्यातील किल्ले सुरगड हा गिरीदुर्ग जंगलाने वेढलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खांब गावापासून महामार्ग सोडून वैजनाथ गाव गाठायचे. वैजनाथ मधुन चालत घेरासुरवाडी मार्गे गडाकडे मळलेली वाट जाते. आडवा येणारा ओढा पार करून डोंगरधारेवर स्वार व्हायचे.

सुरगडास उजवीकडे ठेवत चालत गेल्यावर गडावरून उतरणारी पहिली घळ लागते. या घळीतून चढून गडावर जाता येते, पण हा मार्ग जरा कठिण आहे. दुसरा मार्ग, ही घळ सोडून अजून उत्तरेकडे चालत गेल्यावर अजून एक घळ लागते. या मार्गे गड चढाई सोपी असून पुढे बुरूजयुक्त तटबंदी आणी दरवाजातून गडप्रवेश होतो. पठारावर खंदक खोदून गड वेगळा केला आहे. गडावर वाड्याचे रिकामे चौथरे, पाणी टाकी, शिलालेख, घरांची जोती, देवीचे मंदिर पहायला मिळतात. गडाच्या दक्षिण टोकाचा भाग एका घळीने वेगळा झालेला आहे. दक्षिण टेकडीवर मिशा असलेल्‍या हनुमंताचे मंदिर, घरांची जोती, पाणी टाके दिसते. याच टोकावरून सुधागड, सरसगड, तैलबैला या गडांचे दर्शन होते.

गडाच्या शिलालेखावरून असे कळते की, गडाचा हवालदार व गड बांधणाऱ्याचे नाव सुर्याजी आणी सुभेदाराचे नाव तुकोजी हैबत होते. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिव यांनी सिद्धी कडून जिंकून घेतला.

किल्ले सुरगड, ता. रोहे, जि. रायगड

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment