वैभव महाराष्ट्राचे!
बीड जिल्ह्यात धारूर व धर्मापुरी असे दोनच किल्ले आहेत. धर्मापुरी किल्ला हा स्थलदुर्ग असून तो धर्मापुरी गावाला लागूनच आहे. धर्मापुरी गावाला पोहचण्यासाठी पुणे - अहमदनगर - जामखेड - मांजरसुंबा - केज - अंबाजोगाई - धर्मापुरी किंवा पुणे - सोलापूर - लातूर - रेणापुर - धर्मापुरी असा लांबचा प्रवास करावा लागतो. मुक्कामाची सोय अंबाजोगाई गावात होईल. धर्मापुरीचा किल्ला हा त्रिकोनी आकाराचा असून छोटेखानी आहे. एका छोट्या टेकडीवर किल्ला बाधलेला असून शत्रू तटबंदी जवळ येउनये म्हणून टेकडीचे दगड तासलेले आहेत. दगडी तटबंदी चांगली असून त्यावरील मातीची तटबंदी ढासळलेली आहे. किल्ल्यात पुर्वेकडे असलेल्या पडक्या दरवाजातून प्रवेश करता येतो. पहिल्या दरवाजा पुढे दुसरी बुरूज, तटबंदी लागते. तीच्यातील एका भक्कम बुरूजात दक्षिण मुखी प्रशस्त दरवाजा आहे. दरवाजा समोरील बुरुजाला व तटबंदीवर अनेक शिल्प कोरलेले दगड ठिक ठिकाणी लावलेले दिसतात. तसे पहाता किल्ल्याच्या संपुर्ण तटबंदीवर आतबाहेरून असे दगड लावलेले दिसतात. शिल्पांचे निरीक्षण केले असता, ते कुठल्यातरी मंदिराचे असल्याचे जाणवते. दक्षिणमुखी दरवाजातून आत गेल्यावर सैनिकांच्या देवड्या दिसतात व त्यांच्या पुढे किल्ल्याचा तीसरा दरवाजा आहे. त्याची पडझड झालेली आहे. दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूची निमुळती होत गेलेली तटबंदी नजरेस पडते. किल्ल्यातील वास्तू पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर चढण्यासाठी पश्चिमेकडील टोकाकडून पायऱ्या आहेत.
तिसऱ्या दरवाजाच्या पुढे डावीकडे तटबंदीला लागून दोन दगडी खोल्या आहेत. त्यांचे दरवाजे छोटे असून चौकटीलाही नक्षीकाम केलेले दगड वापरलेले आहेत. दोन्ही दरवाजा मधे १०० च्यावर ध्यानासाठी बसलेल्या बुद्ध मुर्ती आहेत. या वास्तूला लागुनच पुढे आष्टकोनी आकाराची खोल विहिर आहे. तिच्यात उतरण्यासाठी तटबंदीला लागूनच दगडी पायऱ्या व दोन कमानी असून प्रकाशासाठी दोन छोटे बोगदे आहेत. विहिर पाहून पुन्हा माघारी फिरायचे. तटबंदीला दक्षिण बाजूस एक छोटा दरवाजा आहे. त्याच्या पुढे दोन तीन दगडी खोल्या आहेत. बाहेरील तटबंदी व बुरूजांनवर सुध्दा अनेक नक्षीकाम केलेले दगड आहेत. किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीत दोन मंदिरे आहेत. एक मंदिर चागल्या अवस्थेत असून दुसरे मंदिर छताच्या आतील दगड पडल्यामुळे बुजले आहेत. मंदिरांच्या दरवाज्यावर असलेले नक्षीकाम हे हेमाडपंथी मंदिरांच्या दरवाजा सारखेच आहे. नक्षीकाम हे खुपच सुंदर व अलीकडील काळातील असावे. किल्ल्याच्या पश्चिमेस मोठा तलाव आहे. तलावाच्या पार्श्वभूमीवर किल्ला अप्रतिम दिसतो.
धर्मापुरी गावाच्या पुर्वेस थोड्याच अंतरावर केदारेश्वराचे पुरातन
मंदिर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणी गर्भगृह अशी
आहे. मंदिरास उत्तर, दक्षिण आणी पुर्वेस प्रवेशमार्ग आहेत. मंदिराच्या
गर्भगृहात शिवलिंग असून प्रवेशद्वारास द्वारशाखा कोरलेली आहे. द्वारशाखेत
पत्रशाखा, पुष्पशाका, व्यालशाखा, स्तंभाशाखा असून दोन्ही बाजूस वैष्णव
द्वारपाल आहेत. मंडपाच्या छतावर किर्तीमुख आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूवर
गजरथ आणी मैथुन शिल्प अधिष्ठानावर कोरलेली आहेत. तसेच विष्णू, शिव,
सुरसुंदरी इत्यादींच्या मुर्ती जंघेवर सुंदररीत्या कोरल्या आहेत.
पुर्वेकडील कोनाड्यात शिवमुर्ती, दक्षिणेकडील कोनाड्यात हिरंण्यकश्यपूचा वध
करतानाची नरसिंह मुर्ती तर उत्तरेकडील कोनाड्यात केशवाची मुर्ती कोरलेली
आहे. मंदिराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सुंदर शिल्प कोरलेली आहेत.
धर्मापुरीत गेल्यावर केदारेश्वर मंदिर अवश्य पहावे.
किल्ले धर्मापुरी, ता. आंबेजोगाई, जि. बीड
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment