किल्ला बांधण्याची कारणे
आता किल्ला बांधण्याची कारणे थोडक्यात समजून घेऊ.किल्ला बांधण्याची मुख्य पाच कारणे आहेत.
१) व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी-
सगळ्यात प्रथम किल्ले बांधले गेले ते व्यापारी मार्गावर लक्ष
ठेवण्यासाठी.पूर्वीच्या काळी कोकण किनारपट्टी मध्ये जो काही व्यापार
चालायचा तो माल देशावर म्हणजे घाटावर आणण्यासाठी ज्या वाटा होत्या त्या
मार्गावर व्यापाऱ्यांना लूटारू, दरोडेखोर यांची भीती असे. मग ह्या सर्व
मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी घाटात चौक्या असायच्या आणि त्या चौक्यांमार्फत
व्यापाऱ्यांना संरक्षण पुरवले जायचे. त्याबदल्यात कर घेतला जायचा .अशा
ह्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी शेजारील डोंगरावर किल्ला बांधला जायचा.
तसेच सदर मार्ग हा किल्ल्याच्या माऱ्या खाली कसा येईल हे बघितले जात असे.
उदा: नाणेघाटातील जीवधन किल्ला, माळशेज घाटातील हडसर, निमगिरी इ.
२) स्वरक्षणसाठी बांधण्यात आलेले किल्ले-
अशा प्रकारचे किल्ले राजा रक्षणासाठी किंवा युद्धसमयी स्वतःच्या रक्षणासाठी बांधत असे. उदाहरण द्यायचे झाल्यास प्रतापगड, रांगणा, वासोटा किल्ला .जेव्हा राज्यांवर एखादे परचक्र किंवा संकट येत असे यावेळेस राजा आशा प्रकारच्या किल्ल्यात आश्रय घेत असे.
३) राजपरिवाराच्या निवासासाठी किंवा राजधानीचा किल्ला-
प्रत्येक राजा हा आपल्या राजपरिवाराच्या व मंत्रिमंडळाच्या निवासासाठी
राजधानीचा किल्ला बांधत असे आणि येथून तो संपूर्ण शासन करत असे. अशा
प्रकारचा किल्ला जास्तीत जास्त अभेद्य बनवला जायचा. तसेच सर्व प्रकारचे
अठरा कारखाने, बाजारपेठा, बारा महाल ह्या किल्ल्यावर अाढळतात. मुख्य घोडदळ
आणि पागा तसेच सैन्याचा बहुतांशी तळ राजधानीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी
असायचा. उदा: राजगड, रायगड, यादव कालीन देवगिरी, भोज वंशकालिन पन्हाळा,
नळदुर्ग इ.
४) सत्ता प्रस्थापित करण्यासाठी-
मिळवलेल्या
भूभागावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारचा किल्ला बांधला जायचा.
राजाने युद्धात मिळवलेल्या विशिष्ट भूभागावर लक्ष ठेवण्यासाठी,सत्ता व
प्रभुत्व ठेवण्यासाठी आशा प्रकारचा किल्ला बांधला जायचा . एखादा किल्ला
जेव्हा हातात यायचा तेव्हा त्या किल्ल्याच्या आजूबाजूचा पन्नास किमी
पर्यंतच्या भूभागावर अंमल तेथील किल्ल्यामुळे रहायचा. म्हणून अशा
किल्ल्यांना विशेष महत्व होते. उदा: सिंहगड, शिवनेरी इ.
५) सीमा सुरक्षेसाठी -
आपल्या राज्याच्या सीमेचे शत्रू पासून रक्षण करता यावे तसेच वेळ पडल्यास
युद्धासाठी एखादी राखीव तुकडी किल्ल्यावर ठेवता यावी यासाठी अशा प्रकारच्या
किल्ल्यांची निर्मिती केली जाते , जस जसा स्वराज्य विस्तार होईल तसे तसे
शासनकर्ता त्या त्या भूभागात किल्ला बांधत असे. उदा. छत्रपती शिवरायांनी
बांधलेला जिंजीचा किल्ला, राघोबा दादांनी अटकेपार झेंडे लावल्यावर तेथील
शत्रूवर नजर ठेवण्यासाठी अटकच्या किल्ल्यावर मजबूत ठाणे बनवले इ.
तर अशा प्रकारे वरील मुख्य कारणांसाठी किल्ले बांधले जायचे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग समुद्री किल्ले कशासाठी बांधले जातात
?तर सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि सागरी व्यापारावर नियंत्रण
ठेवण्यासाठी जलदुर्ग बांधले जात असत.
No comments:
Post a Comment