Followers

Monday, 18 May 2020

किल्ले सोंडाई दुर्ग

वैभव महाराष्ट्राचे!

माथेरान डोंगररांगेत सोंडाई दुर्ग हा एक अपरिचित गिरीदुर्ग आहे. मोरबे धरणाच्या मागे व माथेरानच्या कुशीत बसलेल्या सोंडेवाडी गावातून गडावर जाता येते. सोंडेवाडीला पोहचण्यासाठी पुण्याहून बोरघाट मार्गे खोपोली तून चौक या गावी पोहचायचे. चौक मघून कर्जतला जाणाऱ्या रोडला डावीकडे बोरगावचा फाटा फुतटो. बोरगावातून सोंडेवाडीला रोड आहे. बोरगावातूनच सोंडाई दुर्ग दिसतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ३६९ मीटर आहे. सोंडेवाडीच्या थोडे अलिकडूनच उजवीकडे कच्चा रस्ता आहे, या वाटेने गड व त्याच्या जवळील छोट्या डोंगराच्या खिंडीत पोहचायचे. ही वाट एका फार्म हाउस जवळून जाते. खिंडीतून पुर्वेकडे असलेला माथेरान डोंगर रांगेतील सोंडाई दुर्ग छान दिसतो, त्याचा कातळकडा नजरेत ठसतो. खिंडीतून पुर्वेस गडाकडे जाणाऱ्या चांगल्या मळलेल्या पायवाटेने गड चढाईस सुरूवात करायची. सुरूवातीला चढाई अंगावर आहे, थोडी धाप लागते. पुढे वाट तिरपी चढत गडाच्या कातळापाशी पोहचते.

सोंडाई दुर्गाच्या कातळाजवळ दोन प्रशस्त पाणी टाकी आहेत. टाक्यान पासून गडाकडे पाहिल्यावर एक मोठी लोखंडी शिडी दिसते. या शिडीपर्यंत पोहचण्यासाठी सुरूवातीस कातळकोरीव खोबण्या आहेत. शिडीच्या जवळच पुर्वीची कातळकोरीव पायऱ्यांची वाट दिसते. पायऱ्या मधे तुटलेल्या आहेत, तेथे लोखंडी सळईच्या आधारे वर चढता येत होते. परंतु आता येवढी कसरत करण्याची गरज नाही. लोखंडी शिडीवरून टपाटप गड चढायचा की समोरच पाण्याचे प्रशस्त खांबटाके आहे. त्यातील पाणी पिण्यास योग्य असून बारमाही उपलब्ध असते. या टाक्याला चिटकूनच उजवीकडे गुहा आहे. गुहेपर्यंत जाणे थोडे अवघड आहे. कातळाचा आधार घेत जाता येते. गुहेत तीन जण राहू शकतात, गुहा पाहून गडाच्या माथ्याकडे निघायचे. वाट थोडी निसरडी आहे. सोंडाई दुर्गाचा माथा अगदी छोटा असून त्यावर उघड्यावरच सोंडाई देवीची पुरातन दगडी मुर्ती आहे. येथे बऱ्याच घंटा व दिवा असून अजून काही मुर्ती आहेत. सोंडाई दुर्गावरून माथेरानचा डोंगर, मोरबे धरण, प्रबळगड, इरसालगड, कर्नाळा, माणिकगड, श्रीवर्धन व मनरंजन हे किल्ले तसेच नागफणी, डचेस हे सुळके दिसतात.

किल्ले सोंडाई दुर्ग, ता. खालापूर, जि. रायगड

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment