वैभव महाराष्ट्राचे!
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलोला आणी जावळीच्या घनदाट अरण्यातील स्वर्गसुंदर अशा महाबळेश्वर परिसराचा स्पर्श लाभलेला किल्ला म्हणजे मकरंदगड उर्फ मधुमकरंदगड. स्थानीक लोक त्याला घोणसपूरचा किल्ला असे ही म्हणतात. समुद्रसपाटीपासून १२३६ मी. उंचीच्या दोन शिखरांनी मिळून गड बांधण्यात आला आहे. वाई महाबळेश्वरच्या मार्गे आंबेनळीच्या घाटातून, शिरवली - हातलोट रस्त्याने हातलोट आणि घोणसपूर हे पायथ्याचे गावा गाठता येते. चतुर्बेट गावापासून घोणसपूरला जाणारा रोड खुपच अवघड आहे. तिव्र चढ व जाग्यावरील अवघड वळणे, त्या मुळे गाडी खरच सावधपणे चालवावी लागते. आज मधुगडावर जाण्यासाठीचा रस्ता शिल्लक नाही.घोणसपूर गावात पोहोचल्यावर गडाच्या पायथ्याशी मल्लिकार्जुनाचं देऊळ लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मल्लिकार्जुन शंकराचे मंदीर आहे, मुक्कामासाठी हे मंदिर चांगले ठिकाण आहे. येथे दरसाली यात्राही भरते.
मकरंदगड याला सॅडल बँक असेही म्हणतात कारण याचा आकार तट्टूच्या पाठीसारखा आहे. गडावर एक शिवमंदिर आहे, पुढे दिपस्तंभ आहे. मंदिरा मागे साधारण १०० फुट खाली कातळात खोदलेले पिण्यायोग्य पाण्याचे टाके (पांडवकालीन जलाशय) आहेत. तेथुन पुन्हा गडाच्या पडक्या दरवाजा कडे येताना वाटेत दोन कोरडी टाकी आहेत. तसेच गडाच्या दुसऱ्या शिखराकडे (मधू) जाताना वाटेत कोरडे टाके व कापणी सारख्या बुरूजाच्या कातळाला गुहा आहे. त्या गुहेत उतरण्यासाठी प्रस्तरारोहणाची अावश्यकता आहे. येथून पढे वाट खुपच निमुळती व निसरडी होत जाते, तसेच दुसऱ्या भागावर जाण्यासाठी सुद्धा प्रस्तरारोहण आवश्यक आहे. या भागावर पाणी टाकी व तटबंदी आहे.
वासोटा, महिमंडणगड आणि
प्रतापगड यांना जोडणारा हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.च्या १६५६ च्या
सुमारास बांधला. या गडाचे वैशिष्ठ म्हणजे या गडाच्या एका बाजूने महाबळेश्वर
दिसते तर दुसर्या बाजुने कोकण प्रांताचे आणि समुद्र किनार्याचे विलोभणीय
दर्शन दुर्बिणीच्या साहय्याने घेता येते. या गडाभोवती जावळीचे घनदाट अरण्य
पसरलेले असून त्यात हिंस्र श्वापदांची वस्ती आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment