Followers

Monday, 18 May 2020

किल्ले मोरगिरी

वैभव महाराष्ट्राचे!


किल्ले मोरगिरी हा एक दुर्लक्षित गिरीदुर्ग आहे. त्याला जाण्यासाठी पौड - तिकोना - अजिवली - मोरवे किंवा लोणावळा - घुसळखांब - मोरवे असे जाता येते. मोरवे गावा पासून गडाचा पायथा लांब आहे. दक्षिण - उत्तर पसरलेल्या डोंगर रांगेच्या उत्तर टोकावर ‘मोरगिरी’ उभारला आहे. मुख्य रस्ता सोडून डावीकडे मोरगिरीच्या पायथ्याला गाडी जाते. पश्चिमेला गडाकडे चालायला सुरुवात करायची. कोण्या कंपनीने किल्याच्या पठारावर जाण्यासाठी एका भल्या मोठ्या घळीतून चक्क रस्ता काढला आहे, मात्र वन खात्याने बंदी आणल्याने आणि रस्त्यात मोऱ्या न काढल्याने पूर्ण रस्ता वाहून गेला आहे. रोड गडाला उजवीकडे ठेवत जातो, त्यावर साधारण पाच सहा मिनिटे चालून कारवी कडे लक्ष ठेवायचे. एक पायवाट उजवीकडे फुटते, रस्ता सोडून १५ फूट उंच कारवीच्या रानातून छातीवर येणाऱ्या चढावर निघायच, कारवी आहेच आधाराला.

साधारण तासाभराने दुर्गात प्रवेश होतो. एका चिंचोळ्या वाटेवर, कड्यात खोदलेली ३ पाण्याची टाकी आहेत, दोन टाकी वेगवेगळी कोरली आहेत आणि एका गुहेत जाखमाई देवीचे ठाणे आणि एक टाके एकत्रित आहे. शेंदूर फासलेली देवी व तेथील स्वच्छता बघून प्रसन्न वाटते. येथेच एक सौर दिवा लावला आहे. येथूनच गडाच्या माथ्यावर जाण्यास वाट आहे. १० फुटी कातळ कड्यावर थोड प्रस्तरारोहण करायचे आणि खाली ६०-७० फूट कडा पहायचा. (या ठिकाणी आता शिडी लावली आहे.) येथून पुढे अधूनमधून कातळकोरीव तुटलेल्या पायऱ्यांनी माथ्यावर पोहचायचे. माथ्यावर एक मोठे चौरास खोदीव पाणी टाके, एक जोत्याचे बांधकाम आहे. बाकी माथा अगदी अटोपशीर आहे. मोरगिरी हा किल्ला टेहळणीसाठी उत्तम जागा असावी. येथून कोरीगड, तुंग, तिकोना छान दिसतात.
किल्ले मोरगिरी, ता. मावळ, जि. पुणे

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment