Followers

Saturday, 30 May 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🚩






पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  🚩

चोंडी ता. जामखेड , जि. अहमदनगर
हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. याच गावात 31 मे 1725 रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला . पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव होळकरांशी त्यांचा विवाह झाला. अहिल्यादेवी बालपणापासूनच शुर, चाणाक्ष, तल्लख व कुशाग्र बुद्धीच्या होत्या. पुढे 1754 मध्ये खंडोजीराव होळकर कुंभेर या ठिकाणी झालेल्या लढाईत मारले गेले.सासरे मल्हारराव अहिल्याला म्हणाले, "माझा खंडू गेला म्हणून काय झालं? तुझ्या रूपानं माझा खंडू अजून जिवंत आहे. तू सती जाऊ नकोस." अहिल्यादेवींनी ते ऐकलं.अहिल्यादेवींच्या हाती सत्तेची सुत्रे दिली गेली. त्यांनी अनेक ठिकाणी शत्रुला धुळ चारून लढाया जिंकल्या. अहिल्यादेवी या उत्तम तिरंदाज होत्या. त्या उत्तम न्यायाधिश, उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी महिलांची फौज निर्माण केली होती .उत्तर भारतात माहेश्वरी येथे 27 वर्षे त्यांनी राज्य केलं.
चोंडी या ठिकाणी आजही त्यांचा राहता वाडा आहे. वाड्यामध्ये अहिल्यादेवींच्या गौरवशाली इतिहासातील अनेक प्रसंगांची शिल्पे बनवण्यात आलेली आहेत. वाड्याबाहेर त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा व स्मृती स्तंभ उभारण्यात आलेला आहे.
एका छोट्याशा गावात सामान्य कुटूंबात जन्माला आलेली मुलगी आपल्या शौर्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तर भारतात राज्यकर्ती बनू शकते. आजच्या युवकांनी अशा महापुरुषांच्या संघर्षमय जीवनकार्याचा आदर्श घेतल्यास आजचा तरुण परिस्थितीवर रडत बसणार नाही, तर तो परिस्थितीशी धैर्याने लढेन आणि निश्चितच प्रगती करू शकेन. अहिल्याबाई होळकर यांच्या राज्य बरखास्तीचा डाव राघोबा पेशवे यांनी आखला होता.तो चानाक्षपणे अहिल्याबाई होळकर यांनी ऊधळून लावला.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन
आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत .व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. "अशा या थोर,कर्तबगार ,पराक्रमी ,अहिल्यादेवीस आमचे विनम्र अभिवादन "
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( अहिल्याबाई होळकर यांचा चांदवड येथील वाडा )

दारूगोळ्याचे भांडार अशी ख्याती असलेला किल्ला

सह्याद्रीची अवघड पर्वत रांग सोडून आपण जेंव्हा मैदानी मुलुखात सरकू लागलो की भुईकोट किल्ल्यांची शृंखला सुरू होते. अर्थात किल्ल्याला सह्याद्रीची सुरक्षा नसल्याने किल्ल्याची मजबुती ठेवणे आणि किल्ल्याच्या भोवताली संरक्षक पाण्याचे खंदकांमध्ये किल्ला आपला कर्तुत्व आणि ताकद दाखवत असे. या किल्ल्यापैकी महत्वाचा किल्ला म्हणजे परांड्या चा भुईकोट किल्ला.

परंड्याला तर काही दिवसांकरिता निजामशहाची राजधानी होती. परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार प्रचंडसुरामुळे या किल्ल्याला परंडा नाव पडले. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड असा आढळतो. त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे आणि अपभ्रंश होऊन परंडा नाव झाले.

बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर परंडा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर निजामाकडे आला. तेव्हा इ.स. १६२८ ते १६३० च्या दरम्यान शहाजीराजांनी मुर्तुजा निजामाला गादीवर बसवून काही काळ परंड्या वरून सुध्दा कारभार चालविला. या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामुळे निजामशाहीच्या काळातच येथील बुरुजांवर निरनिराळ्या तोफा ठेवण्यात आल्या.

यापैकी मलिका-ए-मैदान, कसाब, खडक अझदहपैकर या महत्त्वाच्या आणि शक्तिशाली तोफा असून आज भारतातील नावाजलेली विजापूरच्या सर्जा बुरुजावरील मलिक-इ-मैदान ज्या तोफेला मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाते ती तोफ १६३२ पर्यंत परंड्याच्या बुरुजावर होती. २२ मे १६३२ ला विजापूरच्या दिवाणाने मुरार जगदेवने १० हत्ती आणि ४०० बैलांच्या साह्याने ५५ टन वजनाची महाकाय तोफ विजापूरला नेली.

संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर प्रत्यक्षपणे कोणीही आक्रमण केलेले नाही. तरीपण देखील या किल्ल्यावर असंख्य तोफा आहेत आणि त्या तोफांसाठी लागणारे वेग वेगळ्या आकाराचे तोफगोळे आढळतात. या किल्ल्याचे स्थान मध्यवर्ती असल्या कारणाने या किल्ल्यावर दारूगोळ्याचे भांडार बनवले. एवढा मोठी युद्धसामुग्री अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर सापडत नाही.

औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्रानुसार परंडा किल्ल्यातील हालचाली समजण्यास मदत होते. त्यानुसार इ.स. १६६५ मध्ये मिर्झाराजाने पुरंदर वर आक्रमण केले होते. तेव्हा मोगलांना धडा शिकवावा म्हणून छत्रपती शिवरायांच्या सांगण्यावरून नेताजी पालकर यांनी  परंडा किल्ल्याभोवतीच्या परिसरात धुमाकूळ माजविला होता. मोगलांची फौज परंड्यात येण्यापूर्वीच नेताजी पालकर केव्हाच पसार झाले होते.

१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून बऱ्याच वेळा पुढे जायचा.

असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटूला होता. मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या किल्ल्यावर धनाजी जाधव यांनी बऱ्याच वेळा असा धुमाकूळ घालून औरंगजेब च्या नाकी नऊ आणले होते.

Friday, 29 May 2020

शिवरायांचा असा एक अजिंक्य किल्ला ज्याला इंग्रजांनी आदराने ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ ही उपाधी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक सोहळ्या नंतर स्वराज्य वृद्धी साठी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली. आणि या मोहिममध्ये महाराजांना सापडलेले एक दुर्ग रुपी रत्न म्हणजेच जिंजी चा किल्ला.

शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह जिंजी जवळ पोहोचले तेंव्हा नासिर मुहम्मद हा जिंजीचा किल्लेदार होता. मराठ्यांनी गडाच्या बदल्यात त्याला पन्नास हजाराची जाहगीर देऊ केली. त्याने मान्य केले व १३ मे १६७७ च्या आसपास कुठलाही रक्तपात न होता हा किल्ला मराठ्यांना मिळाला. आता शिवरायांच्या सैन्याला पाहून म्हणा किंवा शिवरायांनी दिलेल्या जहागिरी मुळे म्हणा किल्ला स्वराज्यात आला हे महत्त्वाचं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीकडे कूच केले व त्याची पाहाणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला पाहता क्षणी आवडला. त्याची डागडुजी करून किल्ला अधिक भक्कम आणि अजिंक्य कसा राहील यांकडे लक्ष दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायाजी नालगे या मराठी सरदाराची निवड जिंजीच्या किल्लेदार पदी केली. विठ्ठल पिळदेव अत्रे ह्याला जिंजी सुभ्याचा सुभेदार म्हणून नेमले गेले.

जिंजी मराठ्यांची राजगादी ठरली ती औरंगजेबाच्या महाराष्ट्रावरील आक्रमणानंतर. छत्रपती राजारामांनी जिंजी वर आश्रय घेतला आणि जिंजी ने मोगलांचा वेढा ७ वर्षे झुंजत आपले ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ नाव सार्थ केले. राजगिरी (राजाचा किल्ला), कृष्णगिरी (राणीचा किल्ला),

चंद्रगिरी अशा तीन दुर्गांचा समुह असलेल्या या किल्ल्यात इतिहासातील अनेक वास्तु आपले पाय अडकवून टाकतात. ऍबे बार्थीलिमो कॅरे या फ़्रेंच प्रवाशाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मनातील स्वराज्याबद्दल च मत काय आहे ते लिहिलं आहे.

महाराजांना सिंधु नदीपासुन बंगालच्या उपसागरापर्यंतचा मुलुख स्वराज्याचा भाग करावयाचा होता जिथे प्रजाहीत साधत रयतेचं हित जपलं जावं. या दृष्टीने त्यांची वाटचाल होत होती आणि याची प्रचिती जिंजी येथील भव्य दुर्ग पाहिल्यावर नक्की येते. ‘सेन्जीअम्मा’ या देवीच्या नावावरून किल्ल्याला स्थानिक लोक या किल्ल्याला सेंजी असं देखील म्हणतात.

जिंजी किल्ल्याची निर्मिती साधारणपणे इसवी सन १६०० मध्ये झाली. विजयनगरच्या राजांनी हा किल्ला बांधला असावा. दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या काळात छत्रपती शिवरायांची नजर या किल्ल्यावर गेली पाहणी केल्यावर या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी ‘हिंदुस्थानातील अभेद्य किल्ला’ म्हणून गौरवले होते.

विजयनगरचे मांडलिक असलेल्या जिंजीच्या नायकांनी सोळाशे ते अठराशे सालात या किल्ल्यावर राज्य केले. त्यांचा राज्यकारभार वरकरणी जरी शांततेत चालू आहे असं वाटत असला तरी अधूनमधून यांवर मदुराई, वेलूर आणि चंद्रगिरीच्या राज्यकर्त्यांशी त्यांच्या लढाया होत असत.

१६७४ मध्ये काही काळ तो विजापूरच्या नवाबांच्या ताब्यात होता. त्यानी या किल्ल्याचे नाव होते ‘बादशहाबाद’. विजापूरच्या नवाबांना देखील हा किल्ला जास्त काळ टिकवता आला नाही. पुढे हा किल्ला मराठ्यांनी जिंकला.

संपूर्ण स्वराज्याच्या इतिहासात जिंजीचे महत्व अनन्य साधारण आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर २७ वर्ष सतत मोघल सेनेला स्वराज्याने निकराची झुंज दिली जे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य आहे कारण सतत २७ वर्ष युद्ध कोणत्याही राष्ट्राने आज वर लढलेले नाही, या कठीण परिस्थितीत राजाराम महाराजांना अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन या प्रवासा मध्ये अलौकिक साहाय्य केले.

छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडहून दक्षिणेत जिंजीला हलविली. हिंदवी स्वराज्याच्या अद्वितीय पराक्रमामुळे जिंजी जगाच्या इतिहासात विख्यात झाले औरंगजेबाने प्रयत्नांची शर्थ केली तरी तो जिंजी वर मात करून स्वराज्य बुडवू शकला नाही.

थरारक सांदन दरी

सह्याद्रीत भटक्यांसाठी अनेक थरारक ठिकाणे आहेत. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती होती. परंतु नंतरच्या काळात भटक्यांचा ओघ वाढला, गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि खऱ्या अर्थाने इतके दिवस अज्ञात असलेली ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहिती पडली. असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी.

भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला बाजूला सभोवतीच्या निसर्गशिल्पांच्या गराड्यात मधोमध साम्रद नावाचा आदिवासी पाडा वसला आहे. तिथून चालत चालत आपण रतनगडाच्या दिशेने येतो. अवघ्या १०/१५ मिनिटात आपण एका भल्या मोठ्या घळीच्या मुखाशी पोहोचतो. तेच या प्रसिद्ध अशा सांदण दरीचे मुख आहे.

विशेष म्हणजे ही दरी जमिनीच्या पातळीखाली आहे. या दरीत जाण्यासाठी थोडेसे खाली उतरावे लागते. वसुंधरेच्या गर्भातील एक नितळ आनंद देणारी वाट तुडवताना जणू सृष्टीच आपल्याशी काही गूज सांगू पाहतेय, असेच पावलागणिक वाटत राहते! अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब, जमिनीला पडलेली भेग आहे.

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. ही आपल्या देशातील अशा प्रकारची सर्वात मोठी घळ आहे. अशी ही अद्भुत रूपे पाहिली की निसर्ग नावाच्या किमयागारापुढे आपण किती खुजे आहोत याची जाणीव त्याच्या केवळ दर्शनाने आपल्याला क्षणोक्षणी होत राहते.

घळीच्या सुरुवातीलाचा गार पाण्याचा एक जिवंत झरा आहे. जो उन्हाळ्यातही कधी आटत नाही. एक सोपा कातळटप्पा उतरुन आपण दरीच्या नळीत प्रवेश करतो.

दरीचे वाकडे तिकडे वळण एखाद्या सापासारखे लांबच लांब दिसते. दरीत प्रवेश केल्यावर तिचे ते रूप पाहून आपण चक्रावून जातो. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय अरुंद नाळ आहे. ही नळी दोन्ही बाजूला उभ्या तुटलेल्या काळ्याकभिन्न कातळकड्यांनी बंदिस्त झालेली. पहिला कातळ्टप्पा उतरताच एक लहानसा डोह आपला मार्ग अडवतो.

साधारण १.५ फूट खोल आणि १२/१३ फूट लांब त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून कौशल्याने पार व्हावे लागते. मग तीव्र उतार सुरु होतो. नाळ अधिकाधिक अरूंद होते. कुठेही सपाट मार्ग उरत नाही. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरशः तिथे खच पडलेला दिसतो. मग आणखीन एक मोठा पाणसाठा मार्ग अडवतो.

एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी, तर दुसर्या बाजूला ३ फूट खोल पाणी. हेही पाणी कधी आटत नाही, कारण पाण्याच्या बाष्पीभवनाला सूर्यकिरण इकडे पोहोचूच देत नाहीत. अतिशय थंडगार त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार केवळ प्रत्यक्ष अनुभवावा घ्यावा असाच आहे. मग कधी येताय आमच्या सांदन दरी च्या भेटीला ?

सूचना: 1. सुरक्षित भटकंती करा व सोबतीला कुणाला तरी घ्या, 2. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नये, 3. ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा. व सोबत अत्यावश्यक साधन सामुग्री ठेवा, 4. ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरातील सदस्यांना सांगूनच जा, 5. पायवाटा माहिती नसल्यास स्थानिक वाटाड्या बरोबर ठेवा, 6. मळलेल्या पाऊलवाटांचा वापर करा, अनोळखी वाटेने जाण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.


दुर्गबांधणीतील सर्वात शेवटचा “तरुणगड”

दुर्गबांधणीतील सर्वात शेवटचा “तरुण

स्वराज्यातील अभिमानाने छाती काढून उभे राहिलेले दुर्ग यांच्या पाऊलखुणा शेकडो वर्षांपूर्वी उमटलेल्या दिसून येतात. महाराष्ट्रात गड किल्ल्यांचा इतिहास हा सातवाहन कालखंडापासून आढळून येतो. एवढ्या मोठ्या काळात कित्येक दुर्ग निर्माण झाले, कित्येकांनी इतिहास गाजवला असेल तर पराभवाची दुःख देखील पचवली असतील. तर कित्येक आपल्या हलगर्जीपणा मुळे नामशेष झाले असतील.

पहिला दकिल्ला कधी, कोणी, केव्हा आणि कसा निर्माण केला हे बोट ठेवून आपण सांगू शकत नाही. अगदी अलीकडच्या काळात किंवा स्वराज्यातील शेवटचा बांधलेला किल्ला कोणता तर आपण नेमका किल्ला सांगू शकतो, नव्हे नव्हे आपण स्वतः भटकंती साठी त्या ठिकाणी जाऊ शकतो.

स्वराज्यात अलीकडच्या काळात बांधलेला किल्ला, किल्ल्यांचा इतिहास जर पाहिला तर मराठयांनी बांधलेला शेवटचा किल्ला म्हणजे मल्हारगड. या किल्ल्यांची बांधणी व निर्मिती १७५७ ते १७६० च्या दरम्यान झाली.

अगदी अलीकडच्या काळातील किल्ला असल्याने त्याला तरूणगड असं ही म्हणतात. किल्ल्याचा आकार त्रिकोणी असून बालेकिल्ला ची तटबंदी मात्र चौकोनी आहे. किल्ल्याची उंची ३१६६फूट उंच असून इतर किल्ल्यांचा मनाने याचे भौगोलिक क्षेत्र फार कमी म्हणजे चार ते पाच एकरामध्येच आहे.

जेजुरी पासून बत्तीस किलोमीटर च्या अंतरावर हा किल्ला सोनोरी गावात बांधला म्हणून त्याची स्थानिक ओळख सोनोरी किल्ला म्हणून देखील आहे. खंडोबाच्या नगरीतील हा किल्ला असल्याने त्याचं नाव मल्हारगड पडले असावे. किल्ल्यावर फारशी वर्दळ नसल्याने गडाचा संपूर्ण परिसर साफ व स्वच्छ आहे. गडावर खाण्या पिण्याची सोय नसल्याने आपल्या तशी सोय करावी लागते.

गडावरील विहिरी चा उपसा नसल्याने गडावरील विहिरी च पाणी पिण्याजोगं नाही. गडावर महादेवाचे आणि खंडोबाचे मंदिर आहे. जीर्ण झालेले वाड्यांचे अवशेष शिल्लक राहिले आहे. मुख्य दरवाजा जवळ नैसर्गिक बोगदा निर्माण झाला त्याला सुईचे भोक म्हणतात.

पेशव्यांचे त्यावेळेचे तोफखाना प्रमुख सरदार पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केली. १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्याची पाहणी केली असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळून येत. सरदार पानसेंचा सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे जो किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.

किल्ल्याबद्दल एक दंतकथा प्रसिध्द आहे. किल्ल्याच काम चालू असताना एके ठिकाणी खोदकाम करताना रक्तासारखं पाणी वाहू लागले. पाण्याचे झरे लागतात ते माहीत होतं पण हे रक्तवर्ण पाणी पाहून सर्वजण काम करायला धजावेच ना काम थांबलं ही बातमी सरदार भीमराव पानसेनी यांना कळली.

ते गडावर गेले असता त्यांनी तो पाझर पाहिला आणि मग त्यांनी खंडोबाला साकडे घातले आणि मंदिर बांधण्याचा संकल्प केला. किल्ल्याच बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी खंडोबाच मंदिर बांधलं म्हणून ह्या किल्ल्याला मल्हारगड म्हटलं जातं असावं. पूर्वी किल्ल्यावर तोफखाना होता आणि दुर्दैवाने आता तिथे एकही तोफ पहायला मिळत नाही.

ब्रिटीश काळात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांपासून लपण्यासाठी या किल्ल्यावर आसरा घेतला होता. फंदफितुरीचा शाप या गडाने देखील अनुभवला वासुदेव बळवंत फडके जेंव्हा या किल्ल्यावर आसऱ्यासाठी होते तेंव्हा आपल्यातील काही फितुरांनी ब्रिटिशांना याबाबतची माहिती पुरवली होती. इंग्रजांच्या विरोधात झालेली एकमेव लढाई या किल्ल्याने अनुभवली. परंतु या किल्ल्याचा मुख्य उपयोग हा टेहळणीसाठी आणि दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी होता.

दिवे घाट संपल्यावर काळेवाडी गावातून कच्चा रस्त्याने आपल्याला गडाच्या पायथ्याशी जाता येतं. रस्ता कच्चा असला तरी चारचाकी वाहन सहज जाऊ शकतं.

दुसरा रस्ता झेंडे वाडी मधून येऊन एका खिंडीतून वर येताच मल्हारगडाचे दर्शन होते. सासवड वरून रोज सोनोरी गावात ST जाते. पायथ्याला अलीकडे दीडेक किलोमीटर उतरून आपण किल्ल्यावर पोहोचू शकतो. सह्यप्रेमी तसेच नवख्या ट्रेकर्सना सुरुवात करायला हा गड उत्तम आहे.

गड”

वासोटा आणि त्याची दहशत

एक दहशत यासाठी कि, हा किल्ला ४२६७ फूट उंचीचा असा वनदुर्ग प्रकारातील असून, नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला ‘जावळीच्या जंगला’मधील एक अनोखे “दुर्गरत्‍न” आहे. साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. येथे साहसाबरोबरच कस आणि  मनोधैर्य, इ.ची परीक्षा होते.

जितकी दहशत टकमक टोकाची आहे तितकीच किंवा त्याही पेक्षा भयंकर दहशत आहे. शिवकाळातील दिल्या जाणाऱ्या कैद शिक्षेची इथे दहशत आहे ती कोयनाखोऱ्यात पसरलेल्या दुर्गम आणि निर्भीड जंगलाची आणि सह्याद्रीच्या कड्याकपारीची.

डोक्यावर सूर्य असतानाही सुर्यप्रकाश जमिनीवर पडत नसेल असे घनदाट जंगल, झाडाझुडपांनी वेढलेले अतिशय निर्जन ठिकाण तसेच वाघ, बिबट्या यासह जंगली प्राण्यांचा मुक्त वावर असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासोटा किल्ल्याचा वापर हा ‘तुरुंग’ म्हणून केला जात होता. इंग्रज अधिकार्‍यांना अटक करून तर काहींना कैदी म्हणून येथे ठेवल्याची नोंद आहे. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले होते. येथील दुर्गम परिसराची पेशवाईतही नोंद आहे.

वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.

वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत.

वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता व साहसाची अनुभूती देणारा किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्‍वरपासून दातेगडापर्यंत जाते.

या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. कोयना नदीवर धरण बांधलेले आहे. या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय म्हणतात. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरले असून ते वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे.

पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्‍चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. वसिष्ठचे पुढे वासोटा झालं असावेे, असे बोलले जात आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला.

या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी दि. ६ जून १६६० रोजी वासोटा किल्ला घेतला.

अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी  सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. मात्र, त्यांनी तो सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व दुर्गम अशा वासोट्या किल्ल्यावर त्याला ठेवले. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळेचे वासोटा किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असल्याचे स्पष्ट होते.

वासोटा किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात पायर्‍या लागतात. या पायर्‍यांपासून उजव्या बाजूला एक पायवाट जाते या वाटेने पुढे गेल्यावर एक दरवाजा दिसतो. या दरवाजाजवळ एक हत्तीचे शिल्पही पडलेले दिसते.

हा दरवाजा पाहून परत पाय‍र्‍यांनी वर चढल्यावर आपण वासोटा किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करतो. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे होते. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसर्‍य़ा दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे. 

मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते.येथे झाडीत लपलेले वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. पूढे ही वाट कड्यापाशी जाते येथून नागेश्वर व कोकणाचे दर्शन होते. परत मारुती मंदिरापाशी येउन उजव्या बाजूस जाणारी वाट पकडावी ही वाट ’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते.

या वाटेवर पहिल्यांदा डाव्या हाताला एक मोठा तलाव दिसतो.या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे गेल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर व त्याबाजूची वास्तू पाहायला मिळते. येथून चिंचोळी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते. या माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. 

काळकाईचे ठाणे पाहून पुन्हा मारुतीच्या देवळापाशी आल्यावर डावीकडे जाणार्‍या वाटेवर एक चुन्याचा घाणा पडलेला आहे. पुढे गेल्यावर जोड टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि आपण बाबु कड्यापाशी येऊन पोहोचतो. या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’ अक्षरा सारखा आहे.

याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येते. या कड्यावरून समोरच दिसणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय. नव्या वासोट्याच्या बाबु कड्यावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट झाडे व जंगली हिंस्र जनावरं असल्याने सहसा येथे कोणी जात नाही.

सातशे वर्षांहून अधिक असलेला वैभवशाली भुईकोट किल्ला नळदुर्ग किल्ला

नळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रात असलेल्या भुईकोट किल्ल्यांपैकी सर्वात मोठा किल्ला. सोलापूर -हैदराबाद रस्त्यावर नळदुर्ग या गावांत हा किल्ला आहे. नळदुर्ग किल्ल्याची माहिती मिळवत असताना नळ राजा आणि दमयंती राणीचा इतिहास सांगितला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधला आणि त्याच्या नावावरुन या किल्ल्याचं नाव नळदुर्ग झालं.

नळदूर्ग हे ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे संस्मरणीय तर आहेच पण सध्या पर्यटकांना आकर्षित करणारे स्थान म्हणून सुध्दा प्रसिद्ध होत आहे. इतिहासात जर डोकावून पाहिलं तर या किल्ल्याची नोंद इ.स. ५६७ पासून सापडते.

चालुक्य राजा कीर्तीवर्मनने हा किल्ला नल राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता ही या किल्ल्याबाबतची पहिली नोंद आढळते. त्यानंतर या किल्ल्यावर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. पुढे बहमनीच्या काळात म्हणजे इ.स. १३५१ मध्ये नळदूर्ग किल्ला त्यांच्या ताब्यात आला. बहमनी च्या काळातच या किल्ल्याच्या मजबूती करणाचं बांधकाम करण्यात आले. 

बहामनी राज्यांच्या विघटनानंतर आदिलशाहीच्या भरभराटीच्या काळात म्हणजे इ.स. १४८२ मध्ये नळदुर्ग किल्ल्याचा समावेश  विजापुरच्या राज्यात आला. पुढे जाऊन औरंगजेबाने आदिलशाही नष्ट करून हा किल्ला मुघल साम्राज्यात घेतला.

इ.स. १७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकुन मराठा साम्राज्यात घेतला. इ.स. १७९९ मध्ये निजामाने इंग्रजांबरोबर तह केला. त्यानुसार फ्रेंच सैनिकांऐवजी इंग्रजांचे सैनिक ठेवण्याचे ठरले. या तहाने इंग्रजांचे वर्चस्व हैद्राबादेत प्रस्थापित झाले.

दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे.

नळदुर्ग किल्ल्यावरील पहाण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेत. आणि सध्या हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यावर आवर्जून पाहण्याजोगे म्हणजे किल्ल्याचे प्रवेशद्वार नळदुर्ग गावातून किल्ल्याकडे जाणार्‍या वाटेने जात असताना खंदकावर उभारण्यात आलेल्या पुलावरून किल्ल्याकडे जाता येते. किल्ल्याच्या परिसरात आल्यानंतर काही अंतर चालून गेल्यानंतर पुढे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला बुरुजामध्ये काही खोल्या आहेत. नळदुर्ग किल्ल्याची तटबंदी ३ किमी लांबीची आहे. किल्ल्याच्या परिसरात तटबंदीवर शंभरपेक्षा जास्त बांधलेले बुरुज आहेत. या ठिकाणी बांधण्यात आलेले बुरुज वेगवेगळ्या आकारात आहेत.

त्यातील एका बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो बुरुज किल्ल्याच्या बाहेरील बाजूने पाहिल्यानंतर, हा बुरुज कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो. या बुरुजास “नऊ पाकळ्यांचा बुरुज” किंवा ‘नवबुरुज‘ असे म्हणतात. किल्ल्याच्या आतील बाजूने पाहिल्यानंतर, असे दिसते की, हा बुरुज दोन मजली आहे. किल्लेदार वाड्या जवळ हा बुरुज आहे.

नळदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील सर्वात आकर्षणाचे केंद्र म्हणजे ‘पाणी महाल’ पर्यटक खास आवर्जून या ठिकाणी येतात. किल्ल्यासाठी खंदक म्हणून बोरी नदीचा वापर करण्यात आलेला आहे. नदीचे पात्र वळवून किल्ल्यास खंदक तयार करण्यात आलेला आहे. या खंदकावरच दुसर्‍या आदिलशहाच्या काळात एक बंधारा बांधलेला आहे.

या बंधार्‍याच्या एका बाजूला नळदुर्ग तर दुसर्‍या बाजूला किल्ल्याचा रणमंडळ आहे. या बंधार्‍याच्या आतमध्ये एक छोटा राजवाडा बांधलेला आहे.पावसाळ्यामध्ये पाणी महाल पाहण्यासाठी पर्यटक जास्त गर्दी करतात. पावसाळ्यामध्ये खंदकावरील बंधारा पूर्ण भरल्यानंतर पाणी ह्या बंधार्‍यावरुन वाहते, आणि याच वैशिष्ट्य म्हणजे हा बंधारा आतील बाजूस असलेल्या राजवाड्यामध्ये याचे पाणी जात नाही.

अत्यंत कोरीव दगडी बांधकाम आणि महालाच्या दोन्ही बाजूंनी कृत्रिम पद्धतीनं सोडण्यात आलेले दोन सांडवे. या दोन्ही सांडव्यातून पावसाळ्यात ६५ ते ७० फूट उंचीवरुन पाणी खाली कोसळतं. याला नर-मादी धबधबा म्हणतात. पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा आता वर्षभर वाहता राहण्याची व्यवस्था सुरु केली आहे.

नळदुर्गच्या किल्ल्याचा परिसर खूप मोठा असल्यामुळे, या किल्ल्याच्या परिसर पाहण्यासाठी खूप वेळ लागतो. सोलापूर पासून नळदुर्ग हा ५० किमी अंतरावर आहे. सोलापूर – हैदराबाद रस्त्यावरच नळदुर्ग गावात हा किल्ला आहे. तर तुळजापूर पासून नळदुर्ग ३५ किमी अंतरावर, तर उस्मानाबाद पासून ५० किमी अंतरावर आहे.

चंदन-वंदनगड

सातारा जिल्ह्यातले वाई तालुक्यातला असलेले किकली-बेलमाची गाव समोरच जोड किल्ले
चंदन-वंदनगड...🚩
.
समोर उभा ठाकलेला वंदन किल्ल्याचा हा दरवाजा...
.
सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते त्याच डोंगर शाखेत किल्ले चंदन-वंदन वसलेले आहेत चंदनपेक्षा वंदन उंच आहे साधारण वंदनगड पाच टप्प्यांत तर चंदनगड तीन टप्प्यांत आहे त्या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नद्यांचे खोरे दुभागले जाते चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील किकली गावामध्ये मोडतो तसे इनामपत्रांमध्ये नमुद आहे...
.
छत्रपती शिवरायांनी सातारा प्रांत १६७३ च्या सुमारास जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत चंदन-वंदन यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले नव्या संशोधनानुसार शिवाजी महाराजांनी हे किल्ले १६४२ ला जिंकून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली हे पुढे येत आहे अफझलखान वधानंतर महाराजांनी साताऱ्याचा किल्ला जिंकून या गडांवर आक्रमण केले व गडाची पूर्वीची नावे “शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन-वंदन” नामकरण केले पुढे अमानुल्ला खानाने संभाजीराजांच्या कारकिर्दीत १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला त्या चकमकीत मोगलांच्या हातात पंचवीस घोडी, वीस बंदुका, दोन निशाणे, एक नगारा सापडला तो सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात १६८९ पर्यंत होता नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला छत्रपती शाहुमहाराजांनी तो प्रदेश १७०७ च्या पावसाळ्यात जिंकून घेतला पुढे बाळाजी विश्वनाथांनी त्या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक १७५२ मध्ये ताराबाईसाहेब वर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसा फौजफाटा देऊन केली नंतर तो किल्ला इंग्रजांच्या हातात पडला...
.
बांधकाम आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे दरवाज्याचा भक्कमपणा आजही शाबूत दरवाज्याचा दोन्ही बाजुला फुलांची नकाशी डाव्या बुरुजावर असलेला “श्रीगणेश” आहे...
.
✍️'सचिन पोखरकर'

फोटोग्राफी : निखिल काशीद...♥️

Wednesday, 27 May 2020

शिवकालीन दुर्ग व्यवस्था. भाग 3

शिवकालीन दुर्ग व्यवस्था.
भाग 3

लेखनसिमा!
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

प्रत्येक गडावर महाराजांची नजर होती. महाराजांचे हेरखाते इतके मजबूत होते कि गडावरील प्रत्येक संशयास्पद हालचाल महाराजांचे हेरखाते टिपत असे.परिणामी कितीतरी किल्ले महाराजांनी बऱ्याचदा न लढताच जिंकले पण स्वतःचा एकही किल्ला कधीच फितुरीने गमावला नाही. किल्ल्यावर पाण्याचा वापर काटकसरीने केला जात असे. नैसर्गिक झऱ्यांचा शोध घेऊन तळी आणि टाक्या दगड फोडून बांधल्या जात आणि हेच दगड पुन्हा तटबंदीसाठी वापरले जात. गडावर राजमहालाशिवाय कुठलीही इमारत मोठी नसे. याशिवाय आंबा, पेरू, चिंच, फणस यांसारख्या वृक्षांची लागवड आणि भाज्यांची लागवड गडावर करण्यात येई. दारुगोळा हा वस्ती पासून दूर असे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी साठवला जात असे .
गडावर वैद्य, शास्त्र वैद्य, पंचाक्षरी, जखमा बांधणारे, लोहार, ब्राह्मण, ज्योतिष, वैदिक, रसायने वैद्य, झाडपाल्याचे वैद्य, पाथरवट, सुतार, चांभार, न्हावी ही मंडळी आवर्जून ठेवली जात..
वेळोवेळी किल्ल्यांची डागडुजी करण्यात येई.पावसाळा सरला कि तटावरचे गवत कापण्यात येई. तसेच तटबंदी आणि बुरुजांमध्ये वेल आदी झाडे उगवल्यास ती काढून टाकण्यात येत असत.
प्रत्येक किल्ल्याचा त्याच्या महत्वानुसार वार्षिक महसूल असे.
तर वरील प्रमाणे शिवकाळात कारभार चालायचा. महाराजांनी आखून दिलेल्या नियमांमुळे गड कारभार अगदी चोख राहत असे.
हिंदवी स्वराज्यात किल्ल्यांची संख्या स्वराज्यात चित्रगुप्त बखरीत 361, तर चिटणीसाच्या बखरीत 317 तर सभासद बखरीत एकूण 240 म्हटली आहे.
याशिवाय राजधानीच्या किल्ल्यावर 18कारखाने आणि 12 महाल असत.
#अठरा कारखाने
कारखाने म्हणजे किल्ल्यावर लागणाऱ्या वस्तूंचे कारखाने अथवा कोठारे असे म्हणू शकतो.
1) कोषागार : खजिना आणि मौल्यवान वस्तू धातू ठेवण्याची जागा.
2) रत्नशाळा : वेगवेगळी नवरत्ने ठेवण्याची जागा.
3)अंबारखाना : धान्यसाठा करण्याची जागा.
4) आबदारखान : वेगवेगळी पेये ठेवण्याची जागा.
5) नगारखाना : नगारे वाजविण्याचे साहित्य ठेवण्याची जागा.
6) मल्लशाला : व्यायामशाळा.
7) जामदारखाना : वस्त्रागार, कापडी तागे आदी ठेवण्याची जागा.
8)शस्त्रागार : वेगवेगळी शस्त्रे ठेवण्याची जागा.
9) मुदपाकखाना : स्वयंपाकघर.
10) शरबतखाना : औषधालय.
11) शिकारखाना : शिकारीचे साहित्य ठेवण्याची जागा.
12) दारूखाना : दारुगोळा ठेवण्याची जागा.
13) शहतखाना : मत्स्यालय.
14) गजशाळा : हत्तीचा गोठा.
15) फरासखाना : राहुट्या, शामियाने यांचे सामान आणि कापड चोपड झालरी इत्यादी ठेवण्याची जागा.
16) तोफखाना : तोफांचे साहित्य ठेवण्याची जागा.
17) दप्तरखाना : हिशोबाचे साहित्य ठेवण्याची जागा.
18) उष्टरखाना : उन्टशाला.
#बारा महाल
महाल म्हणजे भंडारगृहे असे.
१) पोते - कोशागार
२) थट्टी - गोशाळा
३) शेरी - आरामशाळा
४) वहिली - रथशाळा
५) कोठी - धान्यागार
६) सौदागीर- व्यापारी
७) टकसाल - मुद्राशाळा
८) दरुनी - अंत:पुर
९) पागा - अश्वशाळा
१०) ईमारत - शिल्पशाळा
११) पालखी - शिबिका
१२) छबिना - रात्रिरक्षणं
या व्यतिरिक्त कमी अधिक काही गडांवर बाजारपेठ, साहुकारपेठ इत्यादी सुद्धा असत.
तर अशाप्रकारे जर राजधानीचा गड असेल तर त्यावर राबता खुप असे. शिवाय वेगवेगळ्या मंत्र्यांचे त्यांच्या हुद्द्यानुसार वाडे असत.
शिवकाळात दुर्ग व्यवस्था चोख होतीच हे वेगळे सांगायची गरज नाही पण महाराजांनी गडाचा कारभार हा पारंपारिक पद्धतीने न ठेवता स्वतः आखून दिलेल्या पद्धतीने बनवला. त्यामुळे कुठेही कारभारात गलथानपणा दिसत नाही.
म्हणूनच महाराजांसारखा दुर्गवेडा आणि दुर्गदक्ष राजा शोधून सापडणार नाही.

शिवकालीन दुर्ग व्यवस्था. भाग 2

शिवकालीन दुर्ग व्यवस्था.
भाग 2

Raja Chhatrapati Shivaji Maharaj Paper Poster Paper Print ...
लेखनसिमा!
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

एखादा किल्ला जिंकल्यावर लष्करीदृष्ट्या राखणे जितके महत्वाचे तितकेच त्याचा अंतर्गत कारभार सुद्धा चोख ठेवणे महत्त्वाचे. म्हणूनच महाराजांनी कुठल्याही गडाचे कारभार कुण्या एका माणसाच्या किंवा अधिकाऱ्याच्या अखत्यारीत न ठेवता एकमेकांवर विसंबून राहणाऱ्या कारभाऱ्यांच्या हाती दिल्याचे दिसते. अशाप्रकारे महाराजांनी गडावर कारभारासाठी समान पातळीची तीन मुख्य पदे ठेवल्याचे आढळते.
#1) हवालदार किंवा किल्लेदार -
किल्ल्याच्या द्वाराच्या किल्ल्या ह्या हवालदार किंवा किल्लेदाराकडे असत. स्वतः किल्लेदार रोज सुर्यास्थाला किल्ला बंद करताना आणि पुन्हा सूर्योदयाला किल्ला उघडताना द्वारापाशी हजर असे. किल्लेदार हाच गडावरील सैन्याचा मुख्य अधिकारी असे. किल्लेदार हा बेडर, प्रामाणिक आणि सिंहाच्या काळजाचा असावा. तसेच तो स्वामिनिष्ठ आणि स्वतःच्या प्राणाची पर्वा न करणारा असावा.
हवालदारास वार्षिक 125 होन म्हणजेच जवळ जवळ 450 रुपये वेतन असे. त्याच्या हाताखाली किल्ल्याचा सरनौबत आणि त्याच्या खाली गडावर असलेल्या तटानुसार तट सरनौबत ही पदे असत.
गडावरील कुठल्याही अधिकारी पदाची नेमणूक ही वंश परंपरागत नसायची. महाराज स्वतः पारखुन प्रत्येक अधिकाऱ्याची नेमणूक करत आणि कुठल्याही गडावर एकच किल्लेदार अथवा इतर अधिकारी कायम राहत नसत. सदर अधिकाऱ्यांचा कार्यकाल सुद्धा विसंगत असे.
उदा: किल्लेदार 3 वर्षांनी बदले तर तट सरनौबत 4 वर्षांनी बदले तर सबनीस आणि कारखानीस 5वर्षांनी बदलले जात. हे बदललेले कारभारी परत वेगवेगळ्या किल्ल्यांवर बदली होऊन जात.
#2)सबनीस
गडावरील हजेरी घेणे, जमाखर्चाचा हिशोब ठेवणे, सर्व पत्रव्यवहार सांभाळणे ही कामे सबनीस करत असे. याशिवाय गडाखालच्या महसुलाचा हिशोब सुद्धा सबनिसास ठेवावा लागे.ह्या हिशोबावर किल्लेदाराची मुद्रा असे. गडावरून बाहेर जाणारा पत्र व्यवहार सबनीसाच्या अखत्यारीत असे, आणि ह्या प्रत्येक पत्रावर कारखानिसाची मुद्रा असे.
#3)कारखानीस
गडावरील अन्न धान्य, दारूगोळा असे महत्वाच्या वस्तूंचे पुरवठ्याचे काम कारखानिसाकडे असे. त्याचे वाटपाचे काम सबनीसाच्या समोर होई किंवा त्याच्या माणसासमोर होई.
गडावरील रोजंदारीची बांधकामे कारखानीस बघे तसेच रोजमर्रा, हजेरी पत्रक ही कामे तो करी आणि सबनीस त्यावर लक्ष ठेवी. कारखानीस आणि सबनीस या दोघांचे वेतन सारखेच असायचे. याव्यतिरिक्त ह्या दोनही पदांच्या हाताखाली इतर कारकून लोकं सुद्धा असे.
वरील बंदोबस्त शिस्तीत आहे कि नाही हे
पाहण्यासाठी बऱ्याचदा महाराज स्वतः किंवा काही अधिकारी स्वतः भेट देत असत. गडावर मुख्य कारभारी पदे वगळता इतर कोणाचेही कुटुंबकबिले नसत. गडावरील शिबंदीची कुटुंबे गडाच्या खाली असत. परंतु गडाच्या खाली कोणालाही पक्के घर अथवा गढी बांधायची परवानगी नसे. सुरक्षेच्या कारणास्थव गडाचा घेर जितका मोकळा राहील तितका ठेवला जात असे कारण शत्रू कशाच्याही आडून लपून राहू नये हा उद्देश यामागे असायचा.

शिवकालीन दुर्ग व्यवस्था. भाग १

शिवकालीन दुर्ग व्यवस्था.
भाग १

VIDHI ARTS Chhatrapati Shivaji Maharaj Wall Poster - VA0989 Paper ...
लेखनसिमा! श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

इंग्रजी इतिहासकार ग्रँड डफचे वाक्य आहे तो म्हणतो, "किल्ल्यातुन आतबाहेर, कोणी केव्हा जाणे, गस्त केव्हा घालणे, पहारे चौक्या सांभाळणे, व त्याजवर देखरेख ठेवणे या गोष्टींविषयी अगदी सक्तीचे व सूक्ष्म नियम शिवाजीने केलेले असून, प्रत्येक शाखेवरील मुख्य अधिकाऱ्यांची बारीक बारीक कामे सुद्धा ठरवलेली होती. आणि ते मोडण्यास तिळभर जागा नव्हती." वरील उताऱ्यावरून शिवाजी महाराजांचे गड कोटांबद्दल कडक धोरण दिसते. आणि अशाप्रकारच्या शिस्तीमुळेच महाराज प्रदीर्घ काळ  आग्र्यात मुघलांच्या तावडीत अडकून सुद्धा स्वराज्यातील एक सुद्धा गड फितूर नाही झाला. गड किल्ल्यांसोबत महाराजांनी भक्कम मनाची आणि स्वराज्य निष्ठेची माणसे घडवली होती.
आजच्या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्ग कारभार आणि त्यातील बारकावे पाहणार आहोत.   "संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग " हे वाक्य रामचंद्रपंत आमात्यकृत "आज्ञापत्र" या बहुमोल ग्रंथातील आहे.सदर ग्रंथ रामचंद्रपंतांनी महाराजांच्या आज्ञेने लिहिला होता. यातूनच शिवकाळात स्वतः महाराज दुर्ग बांधणी बरोबरच दुर्ग संरक्षण आणि दुर्ग व्यवस्थापनात किती आग्रही होते हे दिसते. असे हे परम नाजूक कार्य विशद करताना पंत पुढे सांगतात, " गडकोट हे संरक्षणाचे कार्य फार नाजूक, परम नाजूक स्थळास एखादा मामलेदारादी जे लोक ठेवणे, त्यांनी भेट केल्यामुळे अथवा शत्रू चालून आला असता नामर्दी केल्यामुळे अथवा त्याचे गाफीलीमुळे स्थळास दगा जाहला तर स्थळासहित तितके राष्ट्र हातीचे गेलेच. उरल्या स्थळास व राष्ट्रास उपसर्ग लागला. शत्रू प्रबळ येऊन पावला असता जो गेला किल्ला, त्या किल्लेकराचे वारे इतर राहिले किल्लेकरास लागोन तेही स्थळास अपाय योजितात. म्हणजे एक राज्यसच धक्का बसतो. या कारणे किल्लेकोट जतन करणे ही गोष्ट सामान्य असे न समजता, तेथील उस्तवारी व शासन यांस तिळतुल्य अंतर पडो न द्यावे". याचाच अर्थ एका गडावर फितुरी झाली तर त्याचा संसर्ग दुसऱ्या गडावर होऊ शकतो म्हणून डोळ्यांत तेल ठेवून लक्ष ठेवावे आणि कर्तव्यात तिळमात्र कसूर करू नये असे तिखट आणि काहीसे काळजीचे उदगार काढल्याचे दिसतात. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही गडाचे सामर्थ्य हे,  त्या गडावरील असणाऱ्या लोकांच्या मनोधैर्यावर ठरते. किल्ला कितीही बळकट असुदेत पण मजबूत मनाची माणसे त्यात नसतील तर तो किल्ला लढविला जाऊ शकत नाही. एखाद्या दुर्गाची संरक्षण व्यवस्था जितकी चोख असेल तितका तो दुर्ग जास्त दिवस लढवला जातो. साठ मावळ्यांनिशी एका दिवसात कोंडाजी फर्जंदांनी  जिंकलेला किल्ले पन्हाळा मुघलांना राजाराम महाराजांच्या काळात 2 वर्षे लढून सुद्धा जिंकता  आला नाही. यातच  छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी आणि शिस्तबद्ध कारभाराचा अंदाज आपल्याला येतो. महाराजांनी दुर्ग संरक्षण यंत्रणा आणि कारभार इतका चोख ठेवला होता की, महाराजांच्या पश्चात या दुर्गांच्या सहाय्यानेच मराठा स्वराज्य टिकले हा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. कितीतरी वेळा महाराज गडाची संरक्षण व्यवस्था पाहण्यासाठी अकस्मात भेट देत. सामान्यपणे गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद होत आणि सूर्योदयाला ते पुन्हा उघडत. एकदा महाराजांनी पन्हाळा किल्ल्याचे द्वार संध्याकाळी बंद झाल्यावर सुद्धा बाहेरून उघडतात का हे तपासण्यासाठी स्वतः भेट दिली आणि 'खासे आम्ही आलो आहोत द्वार उघडा' असा निरोप पाठवला परंतु द्वारपालांनी आणि किल्लेदाराने सकाळ पर्यंत द्वार न उघडल्याचा पुरावा वाचण्यास मिळतो. यावरून आपल्यास अंदाज येऊ शकतो.

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग 7

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग
भाग 7

अथांग सागरात दिमाखात उभा ...
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

#विजयदुर्ग.
साधारणतः 1664 ला शिवरायांनी हा किल्ला जिंकून तो पाडून परत बांधला. आज त्या किल्ल्यावर जी तिहेरी तटबंदी दिसते ती महाराजांनी बांधली. ह्या किल्ल्याबद्दल जी गोष्ट काळाच्या उदरात लपली होती ती आता आता काही वर्षांपूर्वी कळली. ह्या किल्ल्याच्या उत्तर पश्चिमेला किल्ल्यापासून काही अंतरावर पाण्याच्या आत मानवनिर्मित एक 9 फूट जाडीची आणि जवळ जवळ पाऊण किलोमीटर लांबीची, काही अंशात कोनात वळवलेली भिंत बांधलेली आहे की जी भरती असो वा ओहोटी पाण्याच्या वर येत नाही.
ह्या संदर्भात एक ऐतिहासिक पत्र मिळाले. त्यात असा उल्लेख सापडतो की, "विजयदुर्ग जिंकण्यासाठी म्हणून इंग्रजी जहाजांनी रात्रीच्या वेळी किल्ल्यावर हल्ला केला.त्यावेळेस गलबते तोफांचा मारा करण्यासाठी किल्ल्याच्या जवळ जाऊ लागली तशी एक एक करून तीनही जहाजे पाण्यात कशाला तरी आदळून फुटली आणि नष्ट झाली आम्ही कसे तरी किनाऱ्याला पोहत आलो." त्यातल्याच एका पोर्तुगीज खलाशाने हे पत्र लिहिल्याचे दिसते. वरील पत्र कमांडंट ऑफिसर ए. व्ही. गुपचूप यांना लिस्बन ह्या पोर्तुगाल च्या राजधानीत मिळाले. याचा शोध जेव्हा गोव्याच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ओशनोग्राफी ने घेतला तेव्हा त्याचे अवशेष लॅब मध्ये नेऊन त्याची " C14"
नावाची कार्बन टेस्ट केली.या टेस्टच्या आधारे ती भिंत मानवनिर्मित आहे आणि साधारण त्याचा कालावधी महाराजांच्या काळातील आहे हे स्पष्ट झाले.
ह्या भिंतीचे प्रयोजन पाहिल्यास आपणांस असे लक्षात येईल कि किल्ल्यावर सहजा सहजी जवळ जाऊन हल्ला होऊ शकत नाही. कारण इंग्रजी होड्यांचा तळ हा निमुळता आणि पाण्यात खोलवर बुडणारा असतो याउलट मराठ्यांची जहाजे छोटी उथळ तळाची त्यामुळे ती जहाजे ह्या भिंतिवरून सहज येजा करीत. वरील उदाहरण पाहिल्यावर थक्क होतो कारण आजपासून जवळ जवळ साडेतीनशे वर्षांपूर्वी इतके प्रगत तंत्रज्ञान होते कि पाण्याचा आत पाऊण किलोमीटर लांबीची भिंत आपण बांधू शकलो. कशी बांधली असेल अशाप्रकारची भिंत?
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जो प्रयोग केलाय हे बघून भारतीय नौदल सुद्धा आश्चर्यचकित झाले.
मित्रांनो, काळाच्या उदरात असे शिवनिर्मित अनेक चमत्कार लपले असतील यांत दुमत नाहीच. गरज आहे त्याचा शोध घेण्याची. ह्या लेखाच्या माध्यमातून मला हेच सांगायचे आहे कि, जलदुर्ग किंवा सागरी किल्ला म्हटले कि भारतीय पर्यटक नाव घेतो ते फक्त जंजिऱ्याचे पण इतर सुद्धा किल्ले आहेत जे पर्यटकांनी पहिले पाहिजेत. महाराजांनी बांधलेले किल्ले स्थापत्य शास्त्राची प्रतिकं आहेत. आणि ती आपण जरूर अभ्यासली पाहिजेत . जंजिरा जरूर बघा पण जंजिऱ्याच्या आसपास किती तरी सुंदर दुर्ग आहेत जे कि पर्यटकांच्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत . अलिबागच्या किनारपट्टीवर पद्मदुर्ग, कोर्लई, रेवदंडा, खांदेरी उंदेरी हे किल्ले सुद्धा बघण्यासारखे आहेत.
माझा विरोध जंजिरा किल्ला पाहण्याला नाही पण त्यासोबत महाराष्ट्रात अनेक उपेक्षित जलदुर्ग आहेत जे दुर्गप्रेमींनी अभ्यासले पाहिजे, आणि त्यावर सहज जाता येता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे सागरी पर्यटनाला चालना मिळेल ना की त्याचे केंद्रीकरण होईल.अशा प्रकाराच्या ऐतिहासिक ठेव्यांचे निरीक्षण सुद्धा करता येईल. विचार करा मित्रांनो विजयदुर्गची भिंत पाहण्यासाठी जर शासनाने एखादी योजना राबवली तर आपल्या राजाच्या ठायी असलेल्या तात्कालीन जलदुर्गविज्ञानाचा प्रसार व प्रचार सातासमुद्रापार होण्यास मदत होईल. म्हणून माझी सर्व गडप्रेमींना विनंती आहे की हा ठेवा पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर नुसतेच ट्रेकिंगच्या नावाखाली न फिरता, दुर्गभ्रमंतीला अभ्यासू निरीक्षणाची जोड दया. म्हणजे त्यातून नक्कीच आपल्याला काहीतरी शिकता येईल.
जय शिवराय

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग 6

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग
भाग 6

अरब सागर में स्थित सिंधुदुर्ग किला ...
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

#पद्मदुर्गाचे बांधकाम
सागरात उंदराप्रमाणे फिरणारा आणि महाराजांना शेवट पर्यंत झुंज देणाऱ्या सिद्दीला शह देण्यासाठी जंजिऱ्याच्या मागील बाजूस दूर समुद्रात पद्मदुर्ग पाहण्यास मिळतो. महाराजांनी पद्मदुर्गचे बांधकाम करताना कुलाबा किल्ल्याच्या उलट प्रकारची पद्धत वापरली. इथे बांधकामाची भिंत बांधताना दोन दगडांना सांधायला चुन्याचा वापर करत असताना चुन्यासोबत आणखी बऱ्याच गोष्टी वेगवेगळया प्रमाणात वापरल्या. त्यामुळे पद्मदुर्ग आजही दिमाखात उभा आहे.
ह्या तटबंदीच्या भिंतीमधील दगड अक्षरशः लाटांमुळे झिजले आहेत पण चुना जशाचा तसा आहे. म्हणजे महाराजांनी नक्की कोणते केमिकल इंजिनीयरिंग वापरले हा एक संशोधनाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.
#सिंधुदुर्ग
मालवण स्थित सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे मराठ्यांची पाण्यातली राजधानीच. सुरतमध्ये मिळवलेली अमाप संपत्ती महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामात वापरली. हा किल्ला सुद्धा महाराजांच्या सूक्ष्म निरीक्षण पद्धतीचा नमुनाच म्हणावा लागेल. मालवणला महाराज जेव्हा आले त्यावेळी महाराजांना सागरात एक बेट दिसले. त्यास 'कुरटे बेट' म्हणत. त्या बेटाच्या चहुबाजूंनी लहान मोठया अणुकुचीदार खडकांचे निसर्गतःच जणू काय संरक्षित आवरण आहे. इथे जर किल्ला बांधला तर शत्रुच्या मोठया होड्या किल्ल्यापर्यंत पोहचू शकत नाही. मराठ्यांच्या होड्या लहान आणि उथळ असत त्यामुळे त्या सहज किल्ल्यापर्यंत पोहचतील. तर अशाप्रकारे समुद्रातील नैसर्गिक गोष्टींचा अचूक अभ्यास करून महाराजांनी विशाल तटबंदीयुक्त बेचाळीस भक्कम बुरुजांचा किल्ला उभा केला. विशेष म्हणजे ह्या किल्ल्याच्या तटबंदी मध्ये आहे चाळीस शौचालये.
गोमुखी बांधणीचे महाद्वार बुरुजांआड लपलेले सहज लक्षात न येणारे आणि शत्रूला बुचकळ्यात पाडणारे आहे. तसेच सर्व शिवप्रेमींच्या दृष्टीने सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या महाद्वारातील नगारखाण्यातील घुमटीत डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचे ठसे आहेत हे विशेष वंदनीय. हा महत्वपूर्ण वारसा जतन करणे गरजेचे आहे.

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग 5

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग
भाग 5
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.
सदर लेखात आपण महाराजांनी कोकणावर   नियंत्रण मिळवण्यासाठी आरमार उभे करण्यापासून ते सागरी आणि किनारी दुर्गांची साखळी उभी करण्यापर्यंत माहिती घेतली आहे. त्यातील महाराजांनी नव्याने बांधलेल्या किल्ल्यांचे अभिनव प्रयोग पाहणार आहोत. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सामान्य दुर्गप्रेमींना जे प्रश्न पडतात त्याची उत्तरे काही पुस्तकातून तर शोधलेली आहेतच पण त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाऊन परीक्षण केली आहेत.( प्रा. प्र.के.  घाणेकर सरांचे मनापासून धन्यवाद कारण त्यांच्या "शिवरायांचे दुर्गविज्ञान " या नितांत सुंदर पुस्तकाचा एक उत्तम माहितीस्रोत म्हणून खूपच उपयोग झाला.) महाराष्ट्राला जवळ जवळ 700 किलोमीटर ची किनारपट्टी लाभली आहे त्यात लहान मोठे अनेक दुर्ग आहेत. काही जलदुर्ग तर काही किनारी प्रदेशातील पाणकोट आहेत. त्यापैकी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य वेगळेच.  महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये विविधता तर दिसतेच परंतु त्यास स्थापत्यशास्त्र आणि विज्ञानाची जोड सुद्धा दिसते. त्यापैकी अलिबाग जवळील थळ ह्या किनारी किल्ले वजा गावापासून काही अंतरावर समुद्रात उभे आहेत दोन जुळे दुर्ग एक खांदेरी तर दुसरा उंदेरी. #खांदेरी किल्ल्यावरील प्रयोग उंदेरी हा किल्ला जंजिरेकर सिद्द्यांनी बांधला तर खांदेरी महाराजांनी बांधला आहे. खांदेरीचे बांधकाम हे इंग्रजांच्या सामर्थ्याला उघड उघड आव्हान होते. हा किल्ला बांधताना महाराजांना माहित होते की, या  किल्ल्यावर कितीही भक्कम तटबंदी बांधली तरी समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात ती जास्त दिवस तग धरणार नाही. म्हणूनच कि काय महाराजांनी ह्या किल्ल्याच्या बाहेर काळ्या  पाषाणाची रास आणून टाकलेली दिसते. त्याचे प्रयोजन असे की,  ह्या दगडांच्या संपर्कात समुद्राचे खारे पाणी आल्यावर त्यावर 'बरन्याकल्स' या सागरी शिंपल्याच्या वर्गातील प्राण्याची वाढ होते. हे आपण कोकणात फिरताना पहिलेच असेल. मग या दगडावर त्यांचे जणू अणुकुचीदार आवरण चढते. त्यामुळे अशा ठिकाणी लहान होडीतून उतरून जरी शत्रू किल्ल्यापर्यंत आला तरी त्याचा पाय कापला जाऊ शकतो. तसेच त्या जखमेत खारट पाणी जाऊन जी आग होणार ती निराळीच! याव्यतिरिक्त भरतीत उसळणाऱ्या विशाल लाटांचा तडाखा किल्ल्याच्या तटबंदीला लागू नये हे सुद्धा कारण आहे. ( मरिन ड्राईव्ह ला फिरायला गेल्यास अशा प्रकारच्या लाटांच्या पासून किनाऱ्याचे संरक्षण व्हावे म्हणून कॉंक्रिट चे ब्लॉक टाकल्याचे आपण पाहतोच ना.) म्हणजे ज्या गोष्टींचा आपण आज उपयोग करतोय त्याचा विचार महाराजांनी 350 वर्षांपूर्वी केला होता हे विशेष. #कुलाबा किल्ल्याची तटबंदी कुलाबा हा किल्ला अलिबाग च्या समुद्रकिनारी आहे. भरती असल्यावर ह्या किल्ल्याला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडतो तर ओहोटीच्या वेळी चालत जाता येते.  ह्या किल्ल्याच्या बुरुजाच्या भिंतीचे बांधकाम पाहिल्यास आश्चर्य वाटते.कारण इतर किल्ल्यांच्या बांधकामात जसे दोन दगड सांधण्यासाठी चुना वापरतात तसं काहीच वापरलेले नाही आणि दोन दगडात लक्षात येईल अशा प्रकारचा गॅप ठेवलेला दिसतो.कशासाठी असेल बरे असे?  हा प्रश्न पडतो. सामान्यतः लाटांचा मारा ह्या भागात खुप असतो आणि पावसाळ्यात तर सागराला रौद्र रूप प्राप्त होते.अशा वेळी  कितीही भक्कम तटबंदी बांधली तरी ती टिकू शकत नाही. सागरी लाटांचा मारा जितका कमी करता येईल तितका कमी करायचा प्रयत्न या फटी करतात कारण लाटांचे पाणी या फटींमधून आत जाते आणि परत तटबंदीच्या तळातून बाहेर येते. तर अशा प्रकारचा प्रयोग महाराजांनी हा किल्ला बांधताना केला आणि ह्या बुरुजांच्या भिंतीचे आयुष्य वाढवले.

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग 4

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग

भाग 4

Forts of Chhatrapati Shivaji Maharaj

लेखनसिमा.

श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.

आपण महाराजांच्या सागरी किल्ले म्हणजे जलदुर्गांच्या बाबतीत केलेल्या अभिनव प्रयोगांबद्दल माहिती घेणार आहोत.

8 फेब्रुवारी 1665 ह्या दिवसाला भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे कारण याच दिवशी इतिहासाच्या कालपटलावर दोन गोष्टी घडल्या - एक मुंबईसारखे व्यापारी बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण म्हणून दिले आणि त्याच दिवशी दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपति शिवरायांनी आपल्या सागरी मोहिमेसाठी स्वतःच्या आरमारासोबत समुद्रावर पहिले पाऊल ठेवले. हीच ती प्रसिद्ध अशी बसरूर ची पहिली सागरी मोहीम.
इतिहासामध्ये काही घटना अशा असतात की, त्यांना आपण फक्त 'co-incidence' म्हणू शकतो, त्यात खऱ्या अर्थाने इतिहासानेच इतिहासाला दिलेला भविष्यातील इतिहासाचा एक गर्भित इशाराच असतो. महाराजांची पहिली समुद्र सफर आणि पहिली सागरी मोहीम एकाच दिवशी असण्यामागे निश्चितच भविष्यातील मराठ्यांच्या बलदंड आरमाराची मुहूर्तमेढ होती. बऱ्याच वेळा शिवचरित्र वाचतांना मन अचंबित होते. फक्त पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत एखादा माणूस पाठीशी कसलं बळ नसताना स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतो काय आणि एकापेक्षा एक किल्ले जिंकत काही बांधत गडपती होतो काय! ह्या पुण्यभूमीला अंकित करून स्वराज्य उभं करतो आणि ह्या भूमीचा भूपती होतो काय! इथेच न थांबता सागरावर शतकोत्तर अधिराज्य गाजवणाऱ्या पारंपारिक शक्तींना आव्हाने देत स्वतःचे बलदंड आरमार उभं करतो काय आणि जळपती होतो काय! हे सारेच थक्क करणारे आणि महाराजांच्या कर्तुत्वाला बहुरंगी, बहुढंगी आयाम चढवणारे आहे.
महाराजांचे हे कर्तृत्व पटवून देताना एका डग्लस नामक इंग्रज अधिकाऱ्याचे उदगार सांगावेसे वाटतात " शिवाजीमहाराज जन्माने खलाशी नव्हते ईश्वराची कृपा समजली पाहिजे. जर ते खलाशी असते तर जमिनीप्रमाणे सागर सुद्धा त्यांनी शत्रूपासून मुक्त केला असता!".
साधारणत: जावळी हस्तगत केल्यानंतर महाराजांचे लक्ष तळकोकणाकडे वळले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले, कोकण किनारपट्टीवर मोकळ्या ठिकाणी शत्रू मोक्याची ठाणे बळकावून बसला होता. गोवा, वसई, रेवदंडा, मुंबई येथे पोर्तुगीज तर डच कोचीन जवळील काही भागात सत्ता बळकावून बसलेत. अगदी पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1608ला आलेले इंग्रज मच्छलीपट्टण, मद्रास, हरिपूर बालासोर, हुबळी, सुरत, राजापूर इत्यादी बंदरे बळकावून बसले होते. हे कमी की काय राजापूरच्या खाडीत जंजिरेकर क्रूर सिद्दींनी कोकणातील काही भागावर सत्ता टिकवून धरली होती. व्यापारीदृष्ट्या ही बंदरं खूपच महत्त्वपूर्ण होती .स्वराज्यातील किनारी भागांना संरक्षण द्यायचे असेल तर ह्या भागात फक्त दुर्ग उभे करून चालणार नव्हते तर फिरंग्यांच्या तोडीस तोड आरमार उभे करण्याची गरज होती, हे महराज जाणून होते. कारण त्यावेळी भारतीय राजांकडे स्वतःचे आरमार नव्हते अगदी इस्लामिक पातशहाला सुद्धा मक्केला जाण्यासाठी पोर्तुगीजांच्या परवान्याची गरज लागायची. त्यामुळे पोर्तुगीजांचा असा समज झाला होता कि सागरावर आमचीच मालकी आहे.आमच्या परवानगी शिवाय कुणीही समुद्रात पाय सुद्धा ठेऊ शकत नाही. हेच त्या दूरदर्शी राजाच्या मनाला टोचत होते. म्हणूनच महाराजांची स्वराज्याचा डाव विस्तारायचा ठरवला.यांत त्यांनी प्रथम कल्याण, भिवंडी, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, अंजनवेल, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, ही महत्वाची बंदरे ताब्यात घेऊन तिथे जहाज बांधणीचे कारखाने खोलले.
बघता बघता हा उदयॊग इतका वाढला कि सुरुवातीला दुर्लक्ष करणा-या परकीय सत्ताधीशांनी मराठ्यांचे आरमार पाहून अक्षरश: तोंडात बोटे घातली! महाराजांचे नियोजन इतके शास्त्रशुद्ध होते की भिंग लावून शोधले तरी त्यात त्रुटी सापडणार नाही.

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग 3

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग
भाग 3

Image may contain: plant and outdoor
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

#रायगडावरील ठराविक अंतरावरील तटबंदीचे आवरण.
शिवपूर्व काळातील किल्ले पाहिल्यास उदा. अजिंक्यतारा, सिंहगड, पन्हाळा इत्यादी दुर्गांच्या तटबंदी ह्या गड माथ्यावर पाहण्यास मिळतात.याउलट शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्याच्या तटबंदी किल्ल्याच्या मध्यापासून ठराविक अंतरावर परत एक तटबंदीचे आवरण पाहवयास मिळते. उदा. रायगडाची अभेद्यता वाढवण्यासाठी किल्ल्याच्या चढाई पासून प्रथम तटबंदी नंतर परत 40 फुटांवर परत तटबंदी उभारून गड अधिकाधिक अभेद्य बनवलेला आहे.
तसेच राजगड येथील तटबंदीमध्ये बऱ्याच ठिकाणी शौचकुपाची योजना आढळते. तटबंदी जवळ पाण्याच्या टाक्या असतात त्या याचसाठी कि, तहान लागल्यास किंवा पोटात काही त्रास झाल्यास सदर सैनिकांस वेढा ढिला सोडून दूर जावे लागू नये. (मला वाटते शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यांव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या किल्ल्यात ही उपाय योजना दिसत नाही.)
#सर्पाकृती दगडी जिना
पाली गणपती जवळील सरसगड प्रसिद्ध आहे ते त्याच्या दगडी सर्पाकृती उभ्या कातळात कोरलेल्या जिण्यासाठी. ह्या पायऱ्या इतक्या सोप्या सुद्धा नाही कि शत्रू हल्ला करून गडावर सहज शिरकाव करू शकेन आणि गडावर जायला दुसरा मार्ग नाही त्यामुळे ह्या सर्पाकृती जिन्यामुळे आणि उभ्या नैसर्गिक कातळी भिंत तासल्यामुळे अभेद्य बनते.
असे अनेक प्रकारचे अभिनव प्रयोग महाराजांनी केलेले दिसतात त्यांपैकी काही सांगण्याचा इथे प्रयत्न केला.
याव्यतिरिक्त असे अनेक प्रयोग रायगडावरील बांधकामाच्या बाबतीत दिसतील आणि त्यासंदर्भात एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. असो तर लवकरच ते सुद्धा कार्य महाराज लवकरच आमच्याकडून करवून घेतीलच. तत्पूर्वी आज आपण शिवरायांनी डोंगरी किल्ल्यांच्या बाबतीत केलेले अभिनव प्रयोग पहिले. वाचकांस ते कसे वाटले जरूर कळवावे. महाराष्ट्र दुर्गांचा देश आहे आणि प्रत्येक दुर्ग सर्वार्थाने वेगळा आहे. त्याची प्रत्येकाची एक कथा आहे. त्याचा प्रत्येकाचा इतिहास आहे,यशोगाथा आहे. प्रत्येकात काहीना काही रहस्य लपलेले आहे. यामागे निश्चित एक शास्त्र आहे, विज्ञान आहे, गरज आहे ते ओळखण्याची. तर मित्रांनो हाच दृष्टिकोन नजरेत ठेऊन शोध घेणे आपले कर्तव्य!
जय शिवराय!