#रायगडाचे_श्रीजगदीश्वर 🚩
जगदीश्वर मंदिराला एका परकोटाने संरक्षण दिले आहे. जगदीश्वर मंदिराचा प्राकार प्रशस्त आहे. १४ हजार चौरस फूट इतकी जागा या देवळाने व्यापली आहे. राजधानीवरील मुख्य देवतांपैकी एक आणि खुद्द छत्रपतींची गाढ श्रद्धा असल्यामुळे मंदिराच्या प्राकाराची भव्यता ही साहजिकच आहे.
जगदीश्वर मंदिराचे त्याकाळी दुसरे प्रचलित असलेले नाव म्हणजे श्री वाडेश्वर. अगदी पेशवेकाळात श्री वाडेश्वर हा उल्लेख आला आहे. त्यामुळे शिवकाळातही तो होत असावा असा तर्क आपल्याला बांधता येतो. जगदीश्वराच्या परकोटाला दोन दरवाजे आहेत. पूर्व आणि पश्चिम या दिशांना तोंड करून उभे असलेले. यांपैकी रायगडाच्या नगारखान्याची छोटी प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे. पश्चिमेचा दरवाजा याच्या मानाने लहान आणि साधा आहे. पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक आहे, त्यावर बरेच नक्षीकाम केलेले आढळते. हा एक छोटा नगारखाना देवळाला लाभलेला आहे. या नगारखान्यावर जाण्यासाठी आतील बाजूस जिनादेखील आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस अत्यंत नक्षीदार असे कोरीव काम केलेले असून वरील दोन्ही बाजूस कमळाचे चिन्ह दिसते. आणखी एक गोष्ट म्हणजे, शिवमंदिराच्या गाभाऱ्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख (कीर्तीमुख) जगदीश्वराच्या पूर्व दरवाजावर आढळते! अशी दोन यक्षमुखे दरवाजाच्या वरील बाजूस अत्यंत सुबकरीत्या कोरलेली आहेत. दरवाजातून आत प्रवेश केला, की फरसबंदी परकोटात बांधलेल्या ओवऱ्या नजरेस पडतात. भक्तांची, प्रवाशांची विश्रांतीची बहुधा ही सोय असावी.
लेखन - डॉ. मिलिंद पराडकर ✍️
No comments:
Post a Comment