Followers

Monday, 4 May 2020

किल्ले व त्यांचे अंग भाग - ३

किल्ले व त्यांचे अंग
भाग - ३

आज महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असणारे गडकिल्ले प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. सद्यस्थितीत हे गडकिल्ले पडझड झालेल्या अवस्थेत असले, तरी पूर्वी ते वैभवसंपन्न होते. किल्ला पाहता - पाहता जर अभ्यासला तर त्याचे मर्म मनाचा ठाव घेते, आणि हे गडकिल्ले पाहताना अभ्यासाचा विषय म्हणजे या गडांची दुर्गबांधणीच. गिरिदुर्ग असो, भुईकोट किंवा जलदुर्ग अश्या विविध प्रकारच्या गडांवर असंख्य वेगवेगळ्या कल्पना गडबांधणी
करताना अंमळ केल्या गेल्या, तट, बुरूज , माची, फांजी, खंदक, जंग्या, चऱ्या इ. ब-याच दुर्गबांधणीतील गोष्टी गडकिल्ले भटकंती करत असताना अनभिज्ञ असल्याने पाहण्याचे राहून जातात. काही समजतात काही समजत नाहीत.
अश्याच गडबांधणी मधील काही ज्ञात-अज्ञात महत्त्वाच्या ठराविक संज्ञांचा थोडक्यात आढावा घेऊया.

प्रकार –  गडाचे प्रामुख्याने गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट/भुदुर्ग, वनदुर्ग, गव्हरदुर्ग, कर्दमदुर्ग, मेढेकोट, जोडकिल्ले असे प्रकार पडतात.

१) भुदुर्ग – नावाप्रमाणेच सपाट जमिनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक यांनी वेढलेला गड/किल्ला भुईकोट/भुदुर्ग या प्रकारात मोडतो. उदा : चाकण ,परांडा ,नळदुर्ग इ.

२) गिरीदुर्ग – उंच डोंगररांगा मध्ये एखाद्या डोंगराच्या, पर्वताच्या शिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरिदुर्ग होय.
उदा: रायगड, तोरणा, राजगड इ.

३) जलदुर्ग – पूर्णपणे अथवा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेल्या  खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त किल्ला म्हणजे जलदुर्ग होय.
उदा : सिंधुदुर्ग, पदमदुर्ग, कुलाबा, विजयदुर्ग इ.

४) वनदुर्ग/वारक्षदुर्ग – घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दुर्गम गड वनदुर्ग या प्रकारात मोडतात.
उदा: सिदगड, वासोटा.

५) गव्हरदुर्ग/गुहादुर्ग - डोंगरात असलेल्या अनेक गुहांचा वापर करून बांधलेला किल्ला म्हणजे गव्हरदुर्ग होय.
उदा: शिवनेरी

६) कर्दमदुर्ग - दलदलीच्या प्रदेशात उभारलेला दुर्ग म्हणजे कर्दमदुर्ग होय.
उदा : वसई चा किल्ला - ह्या किल्ल्याच्या बाजूला दलदल आढळते.

७) कोष्टदुर्ग/मेढेकोट - लाकडी फळ्या व सोटांच्या मदतीने तटबंदी बनवून उभारलेला किल्ला म्हणजे मेढेकोट होय.

८) जोडकिल्ले - एकाच डोंगरावर ,वेगवेगळ्या शिखरावर, जवळपास असलेले गड जोडकिल्ले म्हणून ओळखतात.
उदा:  पुरंदर - वज्रगड, चंदन - वंदन

याबाबत आज्ञापत्रात उल्लेख सापडतो.
“एका गडासमीप दुसरा पर्वत, किल्ला असू नये, असल्यास तो सुरुंग लावून गडाचे आहारी आणावा, जर शक्य नसेल तर बांधून ती जागा मजबूत करावी.“

क्रमशः

No comments:

Post a Comment