Followers

Monday, 4 May 2020

किल्ले व त्यांचे अंग भाग - २

किल्ले व त्यांचे अंग
भाग - २

तर अश्या या विविध गडकोटांचे उपयोग काय ? वापर काय ? फायदा काय ? इतके वेगवेगळे गड बांधले कसे ? गडांवर अवशेष काय ? असे अनेक प्रश्न आपल्याला गडकिल्ल्यांसंबंधी आपल्याला पडतात आणि या सर्वच प्रश्नांची उत्तरे आणि
त्याकाळी या किल्ल्याना असणारे महत्व याची उत्तरे शिवछत्रपतींच्या आज्ञापत्रात मिळतात ….

” संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग….
गडकोट म्हणजे राज्याचे मूळ…
गडकोट म्हणजे खजिना….
गडकोट म्हणजे सैन्याचे बळ…
गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी…..
गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे.
गडकोट म्हिजे सुखनिद्रागार…
किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण…..”

किती सार्थ, समर्पक विधान आहे हे, आज्ञापत्रातील गडकिल्ल्याविषयी असणाऱ्या या ओळीच आपल्याला शिवकाळातील गडकोटांचे महत्त्व सांगून जातात,राज्याच्या संरक्षणासाठी, आक्रमण काळात, राज्य संरक्षणाच्या दृष्ट्टीने, या किल्ल्यांचा खूप मोठा उपयोग झाला आहे. म्हणून एक प्रकारे गडकोट हे राज्याचा खजिना होते, राजलक्ष्मी होते.
प्राणपलीकडे जपलेले आणि बांधलेले हे गडकिल्ले पवित्र होते, वंदनीय होते. या गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना, काहीशी अचंबित करणारी, आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे दुर्गबांधणी. बेलाग उंच कड्यांवर बांधलेले हे किल्ले त्याकाळच्या दुर्गस्थापत्यशास्त्राचा आदर्शवत नमुनाच ठरतात. कधी बेलाग कड्यांशी गुजगोष्टी
करत उभी असलेली तटबंदी दिसते, तर कधी समुद्राच्या लाटांबरोबर गप्पा करत असलेली   उत्कृष्ट्ट, बेलाग बांधकामे डोळ्यांचे पारणे फेडतात. परंतु या अश्या एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष गडबांधणी करणे म्हणजे काय करणे ? एखादा डोंगर बघून भरभक्कम तटबंदी रचने
म्हणजे दुर्ग बांधणी करणे की रहायला एखादे वाडे-हुडे बांधणे म्हणजे दुर्गबांधणी ? असे आहे का? तर निश्चितच नाही, तर याबद्दलही काही दृष्ट्टीकोन अवलंबलेले दिसतात. नैसर्गिक, मानवनिर्मित, भौगोलिक बाबींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. याबाबतही शिवछत्रपतींचे बोल आपल्याला खूप काही सांगून जातात.

किल्ले रायरीच्या पाहणीवेळेचे महाराजांचे वाक्य सभासदाने आपल्या बखरीत लिहून ठेवले आहेत.

“…..राजा खासा जाऊन पाहाता, गड बहुत चखोट….
कडे ताशील्याप्रमाणे, दीड गाव उंच…
पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही…
पाखरू बसू म्हणता तर जागा नाही…
तक्तास जागा हाच गड करावा….”

क्रमशः

साभार - आंतरजालावरील लेख

No comments:

Post a Comment